भारतीय प्रजासत्ताकाच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी उत्तर महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी झेंडावंदनाबरोबर नेत्रदीपक संचलनही पाहावयास मिळणार आहे. यानिमित्ताने नाशिक येथे क्रांतिकारकांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. क्रीडा संस्कृतीचा वारसा जतन करून क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकिक करणाऱ्या खेळाडूंना या दिवशी जिल्हा क्रीडा पुरस्कारांनी गौरविले जाणार आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय कार्यालये, विविध शैक्षणिक संस्था व संघटना यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक शहरातील मुख्य ध्वजवंदन कार्यक्रम रविवारी सकाळी पोलीस कवायत मैदानावर होईल. या वेळी पोलीस, वाहतूक पोलीस, गृहरक्षक दल, रस्ते सुरक्षा वाहतूक पथकातील विद्यार्थी, अग्निशमन दल आदींचे संचलन होणार आहे. धुळे येथील मुख्य ध्वजवंदन कार्यक्रम पोलीस कवायत मैदानावर होणार आहे. नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू ठरलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित झेंडावंदन कार्यक्रम ज्येष्ठ सभासद व पक्षी मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष दिगंबर गाडगीळ यांच्या हस्ते होणार आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इंदिरानगर येथील निवृत्त हौशी चित्रकार अशोक धर्माधिकारी यांनी चितारलेल्या क्रांतिकारकांच्या चित्रांचे प्रदर्शन विद्या विकास चौकालगतच्या हार्मनी आर्ट गॅलरी येथे होणार आहे. २४ ते २६ जानेवारीदरम्यान हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनातील चित्रांमध्ये आदिवासी क्रांतिकारकांचाही समावेश आहे.
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दिले जाणारे जिल्हा क्रीडा पुरस्कार आता प्रजासत्ताक दिनीच वितरित केले जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जिल्हावार क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांचे स्वरूप १० हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे आहे. नाशिक जिल्ह्यात गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी राजश्री शिंदे व जय शर्मा तर क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी राजेंद्र शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पुरस्कार क्रीडा अधिकारी संदीप ढाकणे यांनी जाहीर केले. त्यात गुणवंत क्रीडा कार्यकर्ता-संघटक पुरस्कारासाठी मणिलाल चौधरी (कबड्डी, खो-खो व हॉलीबॉल), गुणवंत क्रीडा मार्गदर्शक अनिल रौंदळ, गुणवंत खेळाडू सुरज वसावे आणि महिला गटात सुनीता वसावे (सर्व खो-खो) यांचा समावेश आहे. या पुरस्कारांचे वितरण प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात क्रीडा व युवक कल्याणमंत्री पद्माकर वळवी यांच्या हस्ते होईल. धुळे जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी गुणवंत खेळाडू म्हणून प्रशांत अशोक धनगर, क्रीडा मार्गदर्शक गटात भूपेंद्र रामदास मानकर आणि गुणवंत क्रीडा शिक्षक व संघटक गटात आनंद जीवन पवार यांची निवड करण्यात आली आहे.
प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी
प्रजासत्ताक दिनाच्या पाश्र्वभूमीवर प्लास्टिकचा राष्ट्रध्वजनिर्मिती, विक्री व वापरास बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा, त्याचा अवमान होऊ नये म्हणून जिल्हा दंडाधिकारी विलास पाटील यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लहान आकाराच्या राष्ट्रध्वजांची मोठय़ा प्रमाणात विक्री होते. त्यात प्लास्टिकच्या ध्वजांचाही समावेश असतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर केला जाऊ नये याकरिता उपरोक्त बंदी घालण्यात आली आहे.