जळगाव महापालिका निवडणूक
महापालिका निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होत असली तरी या दिवशी गटारी अमावास्या असल्याने पहिल्या दिवशी इच्छुकांकडून अर्ज भरले जाण्याची शक्यता कमीच आहे. दुसरीकडे सत्ताधारी खान्देश विकास आघाडी विरोधात महाआघाडी स्थापन करण्याचे विरोधकांचे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे दिसत आहेत.
उमेदवारी अर्ज ६ ते १३ ऑगस्ट या कालावधीत दाखल करता येणार आहेत. आ. सुरेश जैन यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी खान्देश विकास आघाडीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यापर्यंत सर्व बाबतीत आघाडी घेतली आहे. दुसरीकडे सत्ताधारी खान्देश विकास आघाडीच्या विरोधात सर्वपक्षीय महाआघाडी स्थापन करण्याचे सर्व प्रयत्न फसल्याचे दिसू लागले असून राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस आणि मनसे या सर्व पक्षांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली असल्याने सत्ताधारी आघाडीला त्यांची ही भूमिका फायदेशीर ठरणार आहे.
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना अधिवेशनाच्या गडबडीमुळे स्थानिक राजकारणात फारसे लक्ष देता न आल्याने भाजपच्या तंबूत शनिवापर्यंत शांतता होती, परंतु रविवारी ते शहरात दाखल झाल्याने हालचालींना वेग आला आहे. राज्यस्तरावरील मित्रपक्ष शिवसेनेची जळगावात भाजपशी युती नाही. युतीचे दोन्ही नेते सुरेश जैन व एकनाथ खडसे यांच्यात कमालीचे वितुष्ट आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व ३७ प्रभागांत ७५ उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. शिवसेनेच्या मदतीशिवाय २००८ च्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर ११ उमेदवार निवडून आणत तिसरे स्थान पटकावले होते. राष्ट्रवादीने गेल्या निवडणुकीत १५ उमेदवार निवडून आणत मजबूत असे स्थान निर्माण केले होते. खा. ईश्वरलाल जैन यांचे राजकारण या वेळी राष्ट्रवादीसाठी धोकादायक ठरण्याची चिन्हे आहे. खा. जैन यांनी स्वत: सुरेश जैन यांच्या नेतृत्वातील आघाडीलाच बहुमत मिळेल असा केलेला दावा, राष्ट्रवादीच्या बैठकांना खासदारांशी निष्ठा राखणाऱ्या नगरसेवकांची अनुपस्थिती तेच स्पष्ट करते. तरीही पालकमंत्री संजय सावकारे व माजी पालकमंत्री गुलाब देवकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.
तत्कालीन नगरपालिका व आताच्या महापालिकेतही सुमारे दोन दशकांपासून काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. काँग्रेसकडे सर्वच्या सर्व जागांवर लढण्यासाठी इच्छुकही नाहीत. मनसेला नाशिकप्रमाणे परिवर्तन होण्याची, तर समाजवादी पार्टीला भिवंडी व मालेगावप्रमाणे यश मिळण्याची आशा आहे.