देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबीयांना मारहाण करून दोन महिलांकडील सुमारे साडेपाच लाख रुपयांचे दागिने तिघा चोरटय़ांनी लंपास केले. हा प्रकार जैन तीर्थक्षेत्र असलेल्या कुंथुगिरी येथे शुक्रवारी दुपारी घडला. याबाबत हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये लक्ष्मण अजित हुंडेकरी (रा.नागाळा पार्क, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.     
लक्ष्मण हुंडेकरी हे व्यापारी आहेत. ते त्यांच्या मारूती अल्टो मोटारीतून (एम.एच.०९-सी.एम.-५८१०) हातकणंगलेजवळील कुंथुगिरी येथे देवदर्शनाला गेले होते. या तीर्थक्षेत्री चोवीस तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. प्रति संमेदशिखरजी म्हणून या स्थानाला ओळखले जाते. मंदिराकडे जाणारा रस्ता विचारण्यासाठी हुंडेकरी हे रस्त्यात थांबले. त्यांनी दुचाकीवरून चाललेल्या एका व्यक्तीकडे रस्त्याची विचारणा केली. त्याचवेळी आणखी एका दुचाकीवरून दोघेजण तेथे पोहोचले. त्या तिघांनी मोटारीतून प्रवास करणाऱ्या लोकांना काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. चोरटय़ांनी महिलांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने काढून घेऊन पळ काढला.     या प्रकाराबद्दल हुंडेकरी यांनी हातकणंगले पोलिसांशी संपर्क साधला. चोरटय़ांनी सुमारे साडेपाच लाख रुपयांचे दागिने पळविल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यामध्ये पावणेदोन लाख रुपये किमतीचे गंठण, पावणे दोन लाख रुपये किमतीची कर्णफुले, २५ हजार रुपये किमतीची अंगठी, ३५ हजार रुपये किमतीचे गंठण, सात हजार रुपयांची कर्णफुले, सात हजार रुपयांची अंगठी, सव्वा लाख रुपये किमतीचे गंठण, १० हजार रुपये किमतीच्या कानातील सोन्याच्या रिंग या दागिन्यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jwelley of rs 5 50 lakh stolen
First published on: 22-06-2013 at 01:45 IST