कल्याणचा ग्राहक मुरबाडला तर शहापूरचा ग्राहक डोंबिवलीला आपले वीज देयक भरू शकतो, अशी योजना महावितरणच्या कल्याण परिमंडळाने सुरू केली आहे. डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड आणि शहापूर परिसरातील वीज ग्राहक आपल्या हद्दीतील कोणत्याही वीज देयक भरणा केंद्रांवर या सुविधेचा लाभ घेऊ शकतात, अशी माहिती कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता राम मुंडे यांनी दिली. अधीक्षक अभियंता नरेंद्र इंदुलकर, कार्यकारी अभियंता विजयानंद काळे यावेळी उपस्थित होते.
आतापर्यंत कल्याण, डोंबिवली व इतर भागांतील वीज ग्राहकाला आपल्याच हद्दीतील वीज देयक भरणा केंद्रावर वीज देयक भरणा करावे लागत होते. कोठेही वीज देयक भरा (एनी व्हेअर पेमेंट) या योजनेमुळे अंबरनाथचा वीज ग्राहक डोंबिवलीच्या केंद्रावर किंवा कल्याणचा ग्राहक उल्हासनगरच्या वीज भरणा केंद्र वीज देयकाची रक्कम भरू शकणार आहे. नोकरी, व्यवसायाच्या धबडग्यात नागरिकांना दारात सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असे मुंडे यांनी सांगितले. ऑन लाइन वीज देयक भरण्याबरोबर, कधीही देयक भरा यासाठी कल्याण परिमंडळ क्षेत्रात ३२ यंत्र जागोजागी बसविण्यात आली आहेत. वीज मीटर जोडणी घेण्यासाठी कल्याण पश्चिम, डोंबिवली, वसई येथे नागरी सुविधा केंद्र सुरू केली आहेत. ऑन लाइन पद्धतीने मीटर घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विरार, उल्हासनगर येथे ही सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे.  ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पुणे व भांडुप येथे मध्यवर्ती ग्राहक तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आले आहे.  केंद्रावर १०० कर्मचारी चोवीस तास ग्राहकाला सेवा देतात.
इष्टांक पूर्ण होईपर्यंत दरवाढ
ज्या भागात मोठय़ा प्रमाणात वीज हानी आहे तेथेच वीज भारनियमन सुरू आहे. कल्याण परिसरात २३ लाख वीज ग्राहक आहेत. त्यांना २८७ फीडरद्वारे वीजपुरवठा केला जातो. वीज दरवाढीमुळे नागरिक नाराज असले तरी वीज नियमाक आयोगाच्या आदेशाप्रमाणे सहा महिन्यांच्या मुदतीत इष्टांक पूर्ण होईपर्यंत ही दरवाढ आहे. अद्ययावत यंत्रणा व पायाभूत सुविधांसाठी परिमंडळात सुमारे ९०० कोटींची कामे करण्यात येणार आहेत. काही कामे सुरू आहेत. दारिद्रय़रेषेखालील ४७ हजार ग्राहकांना १५ रुपये अनामत भरून वीज जोडणी देण्यात आली आहे. सरल्या महिन्यात कल्याण वीज मंडळाने ६१२ कोटी वीज देयक वसुली केली आहे, असे राम मुंडे यांनी सांगितले.