सार्वजनिक बांधकाम विभागाने कामोठे आणि कळंबोली वसाहतींना जोडणारा रस्ता अद्याप बनविलेला नसल्याने आणि सायन-पनवेल महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत असल्याने वसाहतीमधील रहिवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. कळंबोली व कामोठे वसाहतींना जोडणारा एक अरुंद मार्ग तयार करण्यात आला आहे; परंतु हा एकमेव मार्ग पावसाळ्यात बंद होण्याची शक्यता असल्याने प्रवास तरी कसा करायचा असा प्रश्न या वसाहतीमधील रहिवाशांना पडला आहे.
पाच महिने उलटले तरीही कामोठे व कळंबोली यांना जोडणाऱ्या मार्गाचे काम अर्धवट आहे. कामोठे वसाहतीमधून मुंबईकडे जाण्यासाठी मार्गच बनलेला नाही तसेच कामोठेतील प्रवाशांना मुंबईकडे जाण्यासाठी महामार्गावर बसथांबा म्हणजेच निवाऱ्याची सोय नाही. प्रवाशांनी उन्हाळ्यातील कडकडीत ऊन झेलत येथून प्रवास केला, परंतु तोंडावर आलेल्या पावसाळ्याची कोणतीही सोय सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली नाही. पावसाळ्यात येथून प्रवास करणाऱ्यांना महामार्गावर छत्री उघडून बसची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
 कामोठे थांब्याजवळील भुयारी मार्गाला पाणी लागल्यामुळे हा मार्ग पाण्याखाली गेल्याचे वृत्त ‘महामुंबई वृत्तांत’ने प्रसिद्ध केले होते. त्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने तंत्रज्ञान वापरून हे काम पूर्ण करू, असा दावा केला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागातील तज्ज्ञांचा हा दावा याच भुयारी मार्गातील पाण्याच्या गाळ्यात रुतला आहे. महामार्गाची व समुद्रसपाटीची उंची न तपासता निव्वळ कंत्राटदाराला या भुयारी मार्गाच्या केलेल्या कामाचे बिल मिळावे म्हणून हे काम कसेबसे पूर्ण केल्याचे दाखवले जात आहे. सध्या कळंबोलीकडून पनवेलला जाण्यासाठी कामोठे थांब्यावर जाण्यासाठी थेट रस्ता नाही. कळंबोलीकरांना कामोठे येथे जाण्यासाठी उड्डाणपुलाखालून जावे लागते, तेथेही अर्धवट काम केल्याने खड्डय़ात पाय घसरून अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 विशेष म्हणजे कामोठेकडे जाण्यासाठी एक अरुंद मार्गाची सोय करण्यात आली आहे. हा अरुंद मार्गच कळंबोली व कामोठे वसाहतींना जोडणारा दुवा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाचे पावसाळ्यापुरते रुंदीकरण करुन त्यावर डांबरीकरण केल्यास ती प्रवासी व वाहनचालकांची सोय होऊ शकते. कळंबोली येथील केएलई महाविद्यालय ते कामोठे नोडला जोडणारा या रस्ताच्या मधोमध सिडको प्रशासनाचा सेवारस्ता येतो. हा रस्ता दुरुस्त केल्यास हा मार्ग सर्वाच्या सोयीचा होईल. मात्र सामान्यांसाठी पावसाळ्यापूर्वी सिडको व सार्वजनिक बांधकाम विभाग ते काम करतील याबाबत साशंकता आहे.