जत तालुक्याच्या पूर्व भागाला कर्नाटकातील तुरची-बबलेश्वर योजनेतून पाणी देण्यासाठी कर्नाटक शासन राजी असून या योजनेचे काम जानेवारीमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा कर्नाटकचे जलसंपदामंत्री एम. बी. पाटील यांनी रविवारी गुड्डापूर (ता. जत) येथील पाणी परिषदेत केली.
जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६२ गावे म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून वंचित राहतात. त्यामुळे या गावांना कर्नाटकातील तुरची-बबलेश्वर योजनेतून नसíगक उताराने पाणी मिळावे अशी या गावातील लोकांची आग्रही मागणी आहे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम, केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्या उपस्थितीत पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
कर्नाटकचे जलसंपदामंत्री पाटील यांनी या वेळी सांगितले, की तुरची-बबलेश्वर योजनेतून जत तालुक्याच्या पूर्व भागाला पाणी देण्यासाठी कर्नाटक शासन तयार आहे. या संपूर्ण योजनेसाठी १२०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, योजनेचे प्रत्यक्ष काम दिवाळीनंतर सुरू करण्यात येणार आहे. जानेवारीपर्यंत कर्नाटक सीमेपर्यंतचे काम पूर्ण होईल. या योजनेतून तिकोंडी, सोनलगीमाग्रे बोरनदीतून नसíगक प्रवाहाने संख, भिवर्गी, जालीहाळ, मोटेवाडी या भागातील तलाव भरणे शक्य आहे. वर्षांतून दोन वेळा जरी पाणी सोडले तर दुष्काळी भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न उरणार नाही.
या वेळी डॉ. कदम यांनी सांगितले, की तुरची-बबलेश्वर योजनेबाबत दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील. त्यामुळे दुष्काळी भागाला पाणी देण्यात अडचण उरणार नाही. कर्नाटकचे साखर उद्योगमंत्री प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले, की पंढरपूर, गुड्डापूर आदी देवस्थानच्या ठिकाणी भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी  कर्नाटकची भूमिका कायमच सकारात्मक राहिली आहे. पंढरपूर येथे २० गुंठे जागेवर भाविकांसाठी ७४ खोल्यांचे बांधकाम तातडीने हाती घेण्यात येत आहे. या परिषदेत तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष विक्रम सावंत यांनी प्रास्ताविकात दुष्काळी जनतेच्या अपेक्षा व्यक्त केल्या. परिषदेसाठी आमदार प्रकाश शेंडगे, माजी आमदार उमाजी सनमडीकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पी. एम. पाटील, जतचे नगरसेवक भैया कुलकर्णी, विरोधी पक्ष नेते परशुराम मोरे आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka govt ready to give water from turchi babaleshwar project
First published on: 30-09-2013 at 01:58 IST