प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी अंगणवाडी कर्मचारी संघाने काढलेल्या थाळीनाद निषेध मोर्चात शेकडोंच्या संख्येने सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविकांनी अचानक रास्तारोकोचा पवित्रा घेतल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. यावेळी असे काही घडेल याचा अंदाज नसल्याने पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली.
शासनाचा निषेध करत आंदोलकांनी जानेवारीपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने बेमुदत संपाची जाहीर नोटीस देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी थाळीनाद निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. त्यात मोठय़ा संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या. राज्यात दोन लाख सेविका व मदतनीस कार्यरत असूनही शासन त्यांना शासकीय कर्मचारी मानत नाही. सेविकांना दरमहा चार हजार तर मदतनिसांना दोन हजार रुपये मानधन दिले जाते. इतर कोणतेही लाभ मिळत नसल्याची तक्रार आंदोलकांनी केली. १९९५ पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवाळीत भाऊबीज भेट म्हणून एक हजार रुपयांची रक्कम दिली जात होती. परंतु, यंदा राज्य शासनाने ही रक्कमही दिली नाही.
शासनाच्या कार्यशैलीमुळे अंगणवाडी कर्मचारी संताप व्यक्त करत आहे. ६५ वर्षे वयाचे कारण देऊन हजारो अंगणवाडी सेविका व मदतनिसांची सेवा समाप्त करण्यात आली. शासनाने २००५ व ०८ मध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे लाभ देण्याचे आदेश काढले होते. मात्र, सेवासमाप्त केलेल्यांना ते लाभ न मिळाल्याने त्यांची उपासमार होत असल्याची तक्रार करण्यात आली.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी असा दर्जा द्यावा, दिवाळी बोनस द्यावा, निवृत्तीचे लाभ द्यावेत, वेतनवाढ, महागाई भत्ता, आजारपणाची रजा व इतर सेवेचे लाभ दिले जावेत, अशा मागणीचे निवेदन अंगणवाडी सेविकांनी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाला दिले. या प्रश्नी ६ जानेवारीपासून राज्यातील सर्व कर्मचारी संपावर जाणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
मोर्चात सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर अचानक ठिय्या दिला. यामुळे मेहेर सिग्नल ते सीबीएस दरम्यानची वाहतूक ठप्प झाली. अचानक झालेल्या आंदोलनामुळे आंदोलकांना बाजुला हटविताना पोलीस यंत्रणेला कसरत करावी लागली.c