तरुणाईच्या प्रचंड प्रतिसादाने उत्साहपूर्ण ठरलेल्या लातूर फेस्टिव्हलचा समारोप रविवारी अलोट गर्दीच्या साक्षीने झाला. लातुरातील मान्यवरांना या वेळी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
जिल्हा क्रीडा संकुलावर विशाल-शेखर म्युझिकल नाईटचा कार्यक्रम आयोजित केला होता. अभिनेते रीतेश देशमुख व जेनेलिया देशमुख कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. ‘सलाम नमस्ते’ गाण्याने कार्यक्रमास प्रारंभ झाला. गुजराती कुटुंबात जन्मलेल्या शेखर यांनी पहिले मराठी गीत रेकॉर्ड केल्यानंतर प्रथम रीतेश व जेनेलिया देशमुख यांना ऐकवले असल्याचे सांगितले. या वेळी पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, आमदार दिलीपराव देशमुख यांची उपस्थिती होती. वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते सुमती जगताप व स्वातंत्र्यसनिक मुर्गाप्पा खुमसे यांना जीवनगौरव, माधव गोरे, लता रसाळ यांना कार्यगौरव, तर जागृती चंदनकिरे व कौस्तुभ दिवेगावकर यांना युवागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकाच वेळी शहरातील ६ ठिकाणी लातूर फेस्टिव्हलचे कार्यक्रम सुरू होते. प्रत्येक ठिकाणी गर्दीने विक्रम मोडीत काढले.