विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा येथील टिळकवाडीतील सावित्रीबाई फुले समाजमंदिरात आयटक व भारतीय महिला फेडरेशन यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
या वेळी अ‍ॅड. संगीता चव्हाण यांनी वाढत्या अन्याय व अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी सर्व महिलांनी संघटित व्हावे व एकत्रित येऊन प्रतिकार करावा, असे आवाहन केले. अध्यक्षस्थानी आयटकचे राज्य सचिव राजू देसले हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी लांडे, अ‍ॅड. सागर साळुंके, अ‍ॅड. अनिल साळुंके, भारती खैरे, जिल्हाध्यक्षा संगीता उदमले, अ‍ॅड. राजपाल शिंदे उपस्थित होते. याप्रसंगी विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांचे नेतृत्व करणाऱ्या ज्योती नटराजन (वीज कर्मचारी), चित्रा जगताप (स्त्री परिचर, सटाणा), शोभा चव्हाण (संघटक, मोलकरीण संघटना), मनीषा पवार (आशा कर्मचारी), आशा मोरे (शेत मजूर संघटक, मातोरी), जिजाबाई नाटकर (मोलकरीण), सुमन बागूल (आशा गट प्रवर्तक), आशा धीवर (आशा कर्मचारी, येवला) यांचा शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. देसले यांनी असंघटित क्षेत्रात सर्वात जास्त महिला काम करीत असल्या तरी मूलभूत सुविधांपासून त्या वंचित असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन रेखा पाटील यांनी केले. आभार शहर अध्यक्ष राधा जाधव यांनी मानले. याप्रसंगी ४५० पेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या.