क्षणभंगूर आयुष्य असतानाही वैफल्याचा बाऊ न करता पुढे जाणे इतके सोपे नाही. परिस्थितीवर मात करीतपुढे निघालेल्या स्त्रियांचे चित्रण विदर्भरंग दिवाळी अंकात यथार्थपणे आले आहे. कात टाकून पुढे निघालेल्या या स्त्रियांचा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे, असे उद्गार साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे यांनी काढले. निमित्त होते लोकसत्ता विदर्भ आवृत्तीच्या ‘विदर्भरंग’ दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे!
 ग्रेट नाग रोडवरील लोकसत्ता कार्यालयात छोटेखानी सोहळ्यात या दिवाळी अंकाचे प्रकाशन आशा बगे यांच्या हस्ते करण्यात आले. लहानपणाच्या आठवणींपासून तर अनेक गोष्टींना त्यांनी विदर्भरंग दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मोकळी वाट करून दिली. ‘मला कुठे फारसं जायला आवडत नाही आणि नकाराचं कारण मी शोधतच असते’ हे खुल्या दिल्याने सांगणाऱ्या आशा बगे यांनी विदर्भरंग दिवाळी अंकाची संकल्पना ऐकल्यानंतर नकार देताच आला नाही, हे देखील कबूल केले. साध्या सोप्या शब्दांत संवाद साधत त्यांनी उपस्थितांना जिंकून घेतले.   ‘आला सास गेला सास, जीवा हे तुझं हे तंतर, जगनं मरनं एका सासाचं अंतर’ या संतकवी बहिणाबाईंच्या ओळींची आशा बगे यांनी नव्याने ओळख करून दिली. त्याच वेळी स्त्री जीवनाच्या साचलेपणाविषयी ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या कवितेचाही त्यांनी उल्लेख केला.
यावेळी मॉईलच्या जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला अभ्यंकर, रेशीमबंध मॅरेज ब्युरोच्या संचालिका कविता देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे ब्युरो चिफ देवेंद्र गावंडे, महाव्यवस्थापक बी.के. ख्वाजा, वितरण विभागाचे उपमहाव्यवस्थापक वीरेंद्र रानडे यावेळी उपस्थित होते. यावेळी देवेंद्र गावंडे यांनी या दिवाळी अंकामागील भूमिका मांडली.  दिवाळी अंकाची मुखपृष्ठ रचना व मांडणी करणारे जयंत गोडबोले, चंद्रशेखर कुथे, जयंत मदने, भूषण ठकरेले, छायाचित्रकार सुदर्शन साखरकर यांचाही यावेळी सत्कार आशा बगे यांच्या हस्ते करण्यात आला. संचालन मंदार मोरोणे यांनी केले. राम भाकरे यांनी आभार मानले.
दिवाळी अंकात काय आहे?
विदर्भात विविध क्षेत्रात काम करून नाव कमावलेल्या मान्यवरांची संख्या भरपूर आहे. यापैकी काही मान्यवरांचे अकाली निधन झाले. त्यांनी सुरू केलेल्या कामाचा वसा त्यांच्या अर्धागिनीने पुढे नेला. अशा अर्धागिनींचे आत्मकथन हा यावेळच्या अंकाचा विषय आहे. या मान्यवरांच्या अर्धागिनींना त्यांच्या यजमानांनी सुरू केलेले काम समोर नेताना नेमके कोणते कष्ट उपसावे लागले, कोणत्या अडचणी आल्या, पती निधनानंतर अचानक अंगावर आलेली जबाबदारी त्यांनी कशी पेलली, ही जबाबदारी पार पाडताना यजमानांविषयी त्यांच्या मनात नेमक्या कोणत्या भावना होत्या, या सर्व प्रश्नांची उकल करणारा आत्मकथनपर अनुभवपट, हे या अंकाचे वैशिष्टय़ आहे. अकाली निधन झालेले अभ्यासू नेते डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या पत्नी राजश्री, माजी खासदार उत्तमराव राठोड यांच्या पत्नी उमा, कम्युनिस्ट नेते रामचंद्र घंगारे यांच्या पत्नी प्रभा, विदर्भात नावाजलेल्या ऋचा प्रकाशनचे प्रदीप मुळे यांच्या पत्नी माधुरी, प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य  गोपालकृष्ण व्याघ्रळकरांच्या पत्नी डॉ. रंजना, विदर्भात मोठा शैक्षणिक व्याप असलेल्या चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रमुख संजय जिवतोडे यांच्या पत्नी स्मिता, सत्यशोधक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव लढके यांच्या पत्नी नलिनी यांचे आत्मकथनपर लेख समस्त स्त्रीवर्गाला प्रेरणा देणारे ठरतील. पती निधनानंतरही खचून न जाता समाजसेवेचा वसा सांभाळणाऱ्या काही अनोळखी पण कर्तबगार महिलांचे कथनसुद्धा या अंकाचे एक वैशिष्टय़ आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले गडचिरोलीतील पोलीस अधिकारी चंद्रशेखर वाघाडे यांच्या पत्नीने नंतर शहिदांच्या विधवांसाठी काम सुरू केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या यवतमाळजवळील उषा लंबाडे या महिलेने पतीने आत्महत्या केल्यानंतर विधवांसाठी गृहउद्योग सुरू केला. बुलढाणा जिल्ह्य़ातील शांताबाई पाटील या महिलेने पतीने आत्महत्या केल्यानंतर खचून न जाता १६ जणांचे कुटुंब यशस्वीपणे चालवले. वयाच्या ५० व्या वर्षी वैधव्य आल्यानंतर पतीचा अग्निशमन यंत्र निर्मितीचा उद्योग यशस्वीपणे सांभाळणाऱ्या अमरावतीच्या स्नेहा मुजुमदार या नामवंत नसलेल्या, पण कर्तबगारीने समाजाला प्रभावित करणाऱ्या महिलांचे हृदयस्पर्शी आत्मकथन या अंकाचे वैशिष्टय़ आहे.