गेले नऊ दिवस भक्तांनी सश्रध्द भावनेने केलेल्या पाहुणचाराचा स्वीकार करुन लाडक्या श्री गणरायाने पुढील वर्षी लवकर येण्याचे वचन देत, उत्साही व भावपूर्ण वातावरणात निरोप घेतला. अधुनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, हलगी ताशांचा कडकडाट, नाशिक ढोलचा दणदणाट, संबळाच्या ठेक्याची लय, सनई-तुतारी, सुंद्रीचा मंजुळ सूर अशा जल्लोषी वातावरणात रंगणारे लेझीमचे एकापेक्षा एक अप्रतिम डाव, गुलाल-अर्गजाची मुक्त उधळण, डौलाने फडकणारा भगवा आणि ‘गणपती बाप्पा मोरया-पुढच्या वर्षी लवकर या’ ची साद असे सोलापुरातील श्री विसर्जन मिरवणुकीतील सार्वत्रिक वातावरण होते. तब्बल १८ तासापर्यंत श्री विसर्जन मिरवणूक चालली होती.
शहरात १३३८ तर जिल्हा ग्रामीण भागात १६९५ अशा एकूण ३०३३ सार्वजनिक मंडळानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना केली होती. शहरात रात्री १२ नंतर ध्वनिक्षेपक आणि वाद्यांचा वापर थांबवून पहाटेपर्यंत विसर्जन मिरवणुका चालू होत्या. १२७ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मानाच्या आजोबा गणपतीचे विसर्जन सिध्देश्वर तलावाच्या विष्णू घाटावर पहाटे ३.३५ वाजता झाले. शहर व जिल्ह्यात किरकोळ अपवाद वगळता उत्साही आणि शांततेच्या वातावरणात श्री विसर्जन मिरवणुका पार पडल्या.
शहरात मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळासह लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळ, लष्कर विभाग, पूर्व विभाग, होटगी रोड परिसर, विजापूर रोड परिसर, विडी घरकूल आदी प्रमुख मध्यवर्ती मंडळाच्या अधिपत्याखाली विविध भागांतून श्री विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. गणरायाच्या आगमनापासून ते निरोपापर्यंत वरुणराजाने सोबत केली होती. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत अधुनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे मिरवणुका पाहण्यासाठी आबालवृध्द नागरिकांच्या गर्दीला मर्यादा दिसून आली. कार्यकर्त्यांचाही हिरमोड झाला होता. मात्र बऱ्याच मंडळांच्या मिरवणुका अंगावर पाऊस झेलत कार्यकर्त्यांमध्ये जोष आणि जल्लोष वाढवत होत्या.
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या श्री विसर्जन मिरवणुकीस दुपारी दोनच्या सुमारास राजवाडे चौकातून प्रारंभ झाला. अग्रभागी मानाच्या देशमुख गणपतीची  पालखी होती. चौपाड-बालाजी मंदिर येथे देशमुखांच्या गणपतीची महापूजा महापौर अलका राठोड यांच्याहस्ते झाली. तोपर्यंत अन्य काही मंडळे मिरवणूक मार्गावर आली होती. या मिरवणुकीत थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्या एक हजार खेळाडूंनी लेझीमचे मर्दानी डाव सादर करुन आपली वैशिष्टय़ं, परंपरा कायम राखली. महाराणा प्रताप चितोड मंडळासह मंगळवेढेकर चाळीतील समर्थ तरुण मंडळ, वीर गणपती, सरस्वती सेवक मंडळ, सोमवंशीय क्षत्रीय समाज मंडळ, सरदार वल्लभभाई पटेल मंडळ आदी मंडळांनी लेझीमचे सुरेख डाव सादर करुन मध्यवर्तीच्या श्री विसर्जन मिरवणुकीला रंगत आणली. सर्वात शेवटी श्रध्दानंद समाजाच्या मानाचा आजोबा गणपती होता. पारी अडीच वाजता माणिक चौकातून आजोबा गणपती मिरवणुकीत सहभागी झाला आणि सायंकाळी दत्त चौकात येऊन बराच वेळ थांबला. मध्यरात्री पंजाब तालीम येथे आजोबा गणपतीचे आगमन झाले तेंव्हा स्थानिक मुस्लिम समाजाच्यावतीने माजी नगरसेवक बशीर शेख यांनी ‘श्री’ चे पुष्पहार घालून स्वागत केले. सिध्देश्वर तलावाच्या विष्णू घाटावर पोहोचायला आजोबा गणपतीला पहाटेचे ३.३५ वाजले.
लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाच्या विसर्जन मिरवणुकीस पत्रा तालीम येथून सकाळी दहाच्या सुमारास प्रारंभ झाला. तत्पूर्वी, पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या हस्ते  ‘पणजोबा गणपती’ ची महापूजा करण्यात आली. पत्रा तालीम तरुण मंडळाचा लेझीम ताफा लक्षवेधी होता. शिवाय दांडपट्टा व लाठी-काठीचे चित्तथरारक खेळ पाहावयास मिळाले. चौत्रा पुणे नाका मंडळाच्या गणपतीसमोर लेझीम पथकाबरोबर मोरांनी नृत्याविष्कार सादर केला. क्रांती तालीम, गवळी वस्ती, नरवीर तानाजी, ओंकार गणेश मंडळ आदी मंडळानी लेझीमचे मर्दानी डाव सादर करुन सर्वाना आकर्षति केले. रात्री सव्वा वाजता सिध्देश्वर तलावाच्या गणपती घाटावर पणजोबा गणपतीचे प्रतीकात्मक विसर्जन झाले.
पूर्व विभाग मध्यवर्ती मंडळाच्या मिरवणुकीचा प्रारंभ महापालिका सभागृह नेते महेश कोठे यांच्या हस्ते झाला. मिरवणुकीत सर्वात शेवटी पद्मशाली चौकातील मानाचा ‘ताता गणपती’ होता. दाजी पेठेतील आप्पा गणपती पुष्पपर्णानी सजवलेल्या रथामध्ये विराजमान झाला होता. कन्ना चौक राजा, श्रध्दा गणपती प्रमुख मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लेझीम आणि उडत्या चालीच्या तेलुगु चित्रपट गीतांच्या तालावर सुरेख नृत्य सादर केले. सात किलोमीटर लांबीच्या या मिरवणुकीत पावसामुळे नागरिकांचा सहभाग कमी प्रमाणात दिसून आला. आंध्र दत्त चौकात बराच वेळ मिरवणूक रेंगाळत ठेवून इतर मंडळांना पुढे जाण्यास अडथळा आणल्याप्रकरणी एका मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर दासरी व सचिव पांडुरंग दासरी यांच्याविरुध्द जेलरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लष्कर मध्यवर्ती विभागाच्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ लोधी गल्लीतून झाला. बालाजी मंदिर गणपतीला शेवटचा मान होता. या मिरवणुकीत ७० पेक्षा अधिक लहानमोठी मंडळे सहभागी झाली होती. लेझीम, झांज, टिपऱ्यांचे डाव काही मंडळांनी सादर केले, तर काही मंडळांनी कायदा धाब्यावर बसवून डॉल्बीचा बेसुमार वापर केल्याचे दिसून आले. पोलीस प्रशासनानेही त्याकडे दुर्लक्ष केल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. विजापूर रोड व होटगी रोड परिसर तसेच विडी घरकूल परिसरातही श्री विसर्जनाच्या मिरवणुका उत्साही आणि शांततेच्या वातावरणात पार पडल्या.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lord ganesh immersed with continuous rainfall and enthusiasm
First published on: 20-09-2013 at 02:03 IST