राजधानी दिल्लीतील अनधिकृत झोपडपट्टय़ांना सुविधा देणे तसेच समाधानकारक तोडगा निघेपर्यंत झोपडय़ा हटवू नयेत, हा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस झोपडपट्टी सेलच्या वतीने केजरीवाल यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. असाच निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावा अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस झोपडपट्टी सेलचे प्रदेश अध्यक्ष संजय गालफाडे यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
राष्ट्रवादीने सातत्याने महाराष्ट्रातील झोपडपट्टय़ांना संरक्षण देण्याची भूमिका मांडली आहे. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अजित पवार तसेच नाशिक दौऱ्यादरम्यान शरद पवार यांच्याकडे २००१पर्यंतच्या झोपडपट्टय़ा नियमित करून २०१० पर्यंतच्या अनधिकृत झोपडपट्टय़ांना मूलभूत सुविधा देण्याची मागणी करण्यात आली होती.
यावेळी अजित पवार यांनी दोन हजार सालापर्यंतच्या झोपडपट्टय़ा नियमित करण्याचा निर्णय झाला असून मुख्यमंत्र्यांकडून त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याची माहिती शिष्टमंडळास दिली होती, असे गालफाडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
केजरीवाल यांनी अनधिकृत झोपडपट्टय़ांना मूलभूत सुविधा द्याव्यात तसेच समाधानकारक तोडगा निघेपर्यंत झोपडय़ा हटवू नयेत अशी भूमिका घेतली. अशीच भूमिका महाराष्ट्र शासनाने घ्यावी तसेच झोपडपट्टय़ांविषयीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी इतर विषयांप्रमाणे प्रलंबित ठेवू नये. याविषयी एक महिन्यात निर्णय न झाल्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही गालफाडे यांनी म्हटले आहे.
याबाबत लवकरच झोपडपट्टी सेलची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.