महाराष्ट्राला २ हजार ५०० कोटी रूपयांचे पॅकेज व कर्जमाफी घोटाळ्याची सीबीआय चौकशी या दोन मागण्या भारतीय जनता पक्षाने केंद्राकडे केल्या आहेत. या विषयावरील मंत्रीगटाची बैठक दिल्लीत १३ मार्चला होत आहे. त्यात निर्णय झाला नाही तर भाजपच्या वतीने देश स्तरावर व्यापक आंदोलन करण्यात येईल असे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
शिर्डीला जाताना नगरमध्ये खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जावडेकर थोडा वेळ  थांबले होते. सुवेंद्र गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. सुनील रामदासी, श्रीकांत साठे, अनिल गट्टाणी, शिवाजी शेलार यावेळी उपस्थित होते. नंतर पत्रकारांशी बोलताना जावडेकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका  केली.
जमीन, पाणी, वायू अशा पंचमहाभूतांमध्येही घोटाळा करणारे हे सरकार आहे. केंद्राच्या कर्जमाफी प्रकरणात कॅग ने थोडय़ाच प्रकरणांची तपासणी केली. मात्र त्यातही २२ टक्के प्रकरणात घोटाळाच निदर्शनास आला आहे. ३० हजार रूपयांचे कर्ज असेल त्याला ३ लाख रूपये मिळाले व प्रत्यक्ष गरजवंताला मात्र फुटकी कवडीही मिळाली नाही. कर्जमाफी घेतलेले अनेकजण शेतकरीच नाहीत. या सर्व प्रकाराची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पक्षाने केली असून ती लावून धरणार आहोत असे जावडेकर म्हणाले.
महाराष्ट्रात मोठा दुष्काळ आहे. सर्वाधिक महसूल केंद्राला देणाऱ्या या राज्याला आता केंद्राने देण्याची वेळ आहे. २ हजार ५०० कोटी रूपयांची मदत आम्ही मागितली आहे. पंतप्रधानांनी या विषयावर स्थापन केलेल्या मंत्री गटाची बैठक १३ मार्चला दिल्लीत होत आहे. त्यात यावर निर्णय होणार आहे. अपेक्षित निर्णय झाला नाही तर पक्षाने देशभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती जावडेकर यांनी दिली. राज्यातील सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू असली तरी ती राज्याने जनतेची केलेली फसवणूक आहे असा आरोप त्यांनी केला. जलतज्ञ माधव चितळे यांच्या कार्यकक्षा मर्यादीत आहेत व त्यांनीच ते जाहीर केले आहे. अशा स्थितीत या चौकशीतून काही निघेल हे शक्य नाही. त्यामुळे याही विषयावर पक्ष आक्रमक भुमिका घेऊ असे जावडेकर म्हणाले.