नवी मुंबईतील रेल्वेस्थानकांना ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार राजन विचारे यांनी शनिवारी भेट देत प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी रेल्वेच्या तिकीट भाववाढीचे समर्थन केले असून या भाववाढीबाबत त्यांनी प्रवाशांची मते जाणून घेतली. या पाहणी दौऱ्यात प्रवाशांनी अनेक समस्यांचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. यामुळे संतापलेल्या विचारे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरत, या समस्या सोडविण्यासाठी दोन महिन्याची मुदत दिली आहे.
ठाणे-वाशी-पनवेल ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलमधून प्रवास करत विचारे यांनी प्रवाशांसोबत संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. प्रत्येक रेल्वे स्थानकात प्रामुख्याने तिकीट खिडक्या बंद असणे, शौचालयाची स्वच्छता नसणे, पिण्याच्या पाण्याची सोय नसणे, फलटांवरील साफसफाई व्यवस्थित नसणे आदी समस्यांचा वर्षांव प्रवाशांनी त्यांच्यावर केला. केंद्राने रेल्वे प्रवास भाडय़ात केलेल्या भाववाढीचे समर्थन करताना विचारे यांनी त्याचे खापर काँग्रेसवर फोडत रेल्वे भाववाढ हे काँग्रेसचे पाप असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेला आर्थिक नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी भाववाढ गरजेची होती. परंतु बजेटमध्ये मुंबईला व महाराष्ट्राला जास्तीत जास्त सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे विचारे यांनी सांगितले.
दरम्यान महिला प्रवाशांनी विचारे यांना नवी मुंबईतील रेल्वे स्थानकावरील अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेकडे लक्ष वेधत रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी केली. यावेळी खासदारांनी महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यासमोर पोलीस तैनात करण्यात यावे. तसेच महिला डब्यात पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा, असे निर्देश आधिकांऱ्याना दिले.  नवी मुंबईतील रेल्वे स्थानके सिडकोने बांधली असून नवीन रेल्वे स्थानक दिघा व बोनकोडे उभारणीसाठी सिडकोने निधी उपलब्ध करून दिल्यास रेल्वे ही स्थानके उभारण्यास तयार असल्याचे विचारे यांनी यावेळी सांगितले. यावेळी विविध रेल्वे प्रवासी संघटनांनी खासदारांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या मागण्या रेल्वे प्रशासनापर्यंत पोहचवत त्याचा पाठपुरावा करू, असे आश्वासन विचारे यांनी दिले. प्रवाशांनी त्यांच्या तक्रारी व सूचनांसाठी ई-मेलद्वारे संपर्क साधावा असे आवाहनदेखील त्यांनी केले.