हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील पुनरुज्जीवन व्हावे, या हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘दी डिव्हाइन म्युझिक अनलिमिटेड’ने यंदाही दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन केले असून ते रसिकांसाठी पर्वणीचे ठरणार आहेत. पनवेलमध्ये अल्पावधीत सुरू होणाऱ्या सुसज्ज ‘वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहा’त या उपक्रमांतील कार्यक्रम होणार आहेत.
याबाबत ‘डिव्हाइन’चे संस्थापक जयंत टिळक यांनी सांगितले की, २०१२मध्ये आम्ही ‘दी लिजंड्स’ या शीर्षकांतर्गत मदन मोहन, ओ. पी. नय्यर, रोशन, नौशाद आणि रवी या संगीतकारांच्या कारकिर्दीचा सांगीतिक आढावा घेणारे कार्यक्रम केले होते. येथे प्रथमच झालेल्या या प्रकारच्या कार्यक्रमांना पनवेल व नवी मुंबईतील रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. या पार्श्वभूमीवर यंदा आम्ही वर्षांगीत, सदाबहार युगुलगीत, चाँदगीत आणि सरताजगीत अशा चार कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांदरम्यान चित्रपटसंगीत क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार करण्यात येणार आहे, तसेच प्रेक्षकांसाठी सवरेत्कृष्ट जोडी व सरताजगीत स्पर्धा घेण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने जुन्या काळातील गीतांबाबतच्या रसिकांच्या सुखद आठवणी निश्चितपणे जाग्या होतील, असा आम्हाला विश्वास आहे. अधिक माहितीसाठी संपर्क -चंद्रकांत मने- ८०८२० १५३०५.