नाशिक सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रातील सभासद, ऊस उत्पादकांनी कुठल्याही वाढीव भावाच्या अमिषास बळी न पडता इतर कारखान्यांना ऊस देण्याऐवजी नाशिक साखर कारखान्यास (नासाका)ऊस पुरवठा करावा, असे आवाहन माजी अध्यक्ष तानाजी गायधनी यांनी पत्रकाद्वारे केली आहे. तसेच नासाका ऊसाचा पहिला हप्ता २१०० रुपये प्रति मेट्रिक टन देऊ शकते असेही गायधनी यांनी म्हटले आहे.
नासाकाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पूर्व हंगामी अल्प मुदतीचे कर्ज देण्यास विलंब केल्यामुळे सव्वा ते दीड महिना हंगाम उशीराने सुरूवात होत आहे. या विलंबाने अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोळपेवाडी, संजीवनी, संगमनेर, द्वारकाधीश व विघ्नहर या कारखान्यांच्या टोळ्या आणून ऊस तोडीस सुरूवात केली आहे. त्या कारखान्यांनी प्रत्यक्षात ऊस उत्पादकांना पहिला हप्ता शाश्वत स्वरूपाने जाहीर केलेला नसल्याचे गायधनी यांनी म्हटले आहे. एकमेकांची नावे घेऊन इतरांपेक्षा जादा रक्कम दिली जाईल, असे आश्वासन दिले जात आहे.
या पध्दतीने ऊसाची विल्हेवाट लावली तर नासाकाचा गळीत हंगाम अडचणीत येईल. गळीत हंगामात देश व देशाबाहेरील साखरेचे उत्पादन कमी होणार असल्याने आज ३४-३५ रुपये किलो दराने विकली जाणारी साखर भविष्यात ५० रुपये किलोने विकली जाईल, अशी भितीही गायधनी यांनी व्यक्त केली आहे. बाजारभावाप्रमाणे व कारखान्यास मिळणाऱ्या सरासरी ११ टक्के साखर उताऱ्यानुसार प्रति टनास ११० किलो साखरेस ३५ रुपये भाव दिल्यास एकूण तीन हजार ८५० अधिक ४० किलो मळी, १५० किलो भूसा, राख या उपपदार्थापासून मिळणारे ३०० रुपये, अपेक्षित धरल्यास एका पोत्यास चार हजार १५० रुपये मिळणार आहे. गेल्यावर्षी प्रमाणे प्रती पोत्याचा उत्पादन खर्च १६०० रुपये वजा केल्यास दोन हजार २५० रुपये शिल्लक राहतील. काटकसर केली तर उत्पादन खर्च प्रती पोत्यास ३०० रुपयांना कमी होऊ शकतो. शिवाय साखर भाववाढ झाल्यास आणखीही फायदा होऊ शकतो. ही आर्थिक परिस्थिती विचारात घेता नासाकालाही गळीत हंगामात ऊस उत्पादकांना पहिला हप्ता किमान २१०० प्रती टन देण्यास कोणतीही अडचण नाही. संचालक मंडळाने देखील ऊस भावाची स्पर्धा विचारात घेता पहिला हफ्ता किमान २१०० रुपये जाहीर करावा, त्याचबरोबर मागील हंगामातील दुसरा हफ्ताही देण्याची व्यवस्था करावी, असा पर्यायही त्यांनी सुचविला आहे.