छायाचित्र व पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून निसर्गातील दुर्मिळ प्राणी, पक्षी, औषधी वनस्पती, कीटक, सर्प यांची छायाचित्र व त्याबाबत वैज्ञानिक माहिती पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्याचा उपक्रम मोठय़ा हौसेने राबविणारे पर्यावरणप्रेमी सुधीर कुंभार यांच्या निसर्गज्ञान भीत्तिपत्रकाची नोंद लिम्का बुकने घेतली आहे. पर्यावरण अभ्यासक, पर्यावरणप्रेमी व मान्यवरांनी सुधीर कुंभार यांचे अभिनंदन केले आहे.
एन्व्हायरो फेंड्रस् नेचर क्लब व कराड नगरपालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून पक्षीमित्र सुधीर कुंभार यांच्या संकल्पनेतून साकारलेले पोस्टर प्रदर्शन लाहोटी कन्याप्रशालेत भरविण्यात आले होते.
दुर्मिळ पक्ष्यांमध्ये करकोचा, स्वगीयनर्तक, धनेशपक्षी, समदचोच्या, सर्पमार, गरूड, घुबड आदी दुर्मिळ पक्ष्यांचे फोटो व त्यांची शास्त्रीय माहिती, प्राण्यांमध्ये बिबटय़ा, वाघ, गवा, तरस, उदमांजर, सापांमध्ये विषारी व बिनविषारी साप त्याचबरोबर पक्ष्यांची घरटी, खाद्य, सवयी यांची माहिती प्रदर्शनात छायाचित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आली. वनस्पती व फुलझाडांची माहिती, औषधी वनस्पतींचे विविध प्रकार, वणवा निर्मूलन, तक्सरी, शिकार रोखण्यासंबंधी कृती याचेही मार्गदर्शन प्रदर्शनात करण्यात आले. शाळा, महाविद्यालये, निसर्ग प्रशिक्षण शिबिरे, गणेश, नवरात्रोत्सवात पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून पर्यावरण जागृती करण्यात येत असल्याचे सुधीर कुंभार यांनी सांगितले. निसर्गज्ञान या विषयावर प्रत्येक आठवडय़ाला एक भित्तिपत्रक तयार करण्याचे रेकॉर्ड कुंभार यांचे आहे. त्याची नोंद लिम्का बुकने घेतली आहे. कराडच्या एम. एन. रॉय संस्थेच्या पर्यावरण विभागाचे ते संचालक आहेत.
माजी खासदार श्रीनिवास पाटील, महाराष्ट्र जलबिरादरचे अध्यक्ष सुनील जोशी, सांगली जिल्हा प्रमुख डॉ. रवींद्र व्होरा, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. संदीप श्रोत्री, तहसीलदार सुधाकर भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर मुळुक, नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे, सहायक वनरक्षक सुभाष जाधव, सामाजिक वनीकरणचे शैलेंद्रकुमार जाधव यांनी प्रदर्शनास भेट दिली. सुधीर कुंभार यांच्या एकंदर कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nature knowledge environmental awareness through photo exhibitions
First published on: 11-06-2013 at 01:37 IST