नगर जिल्हा भौगोलिकदृष्टय़ा मोठा आणि राज्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे. जिल्हय़ाला विकासाची उज्ज्वल परंपरा असून ती पुढे नेण्याचा कसोशीने प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवल यांनी बुधवारी दिली.
नवल यांची ठाण्याहून नगरला बदली झाली असून, आजच त्यांनी मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. या वेळी त्यांनी वरीलप्रमाणे ग्वाही दिली. जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती बाबासाहेब तांबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष भोर, प्रशासन अधिकारी अशोक पावडे, जिल्हय़ातील गटविकास अधिकारी या वेळी उपस्थित होते. तांबे यांनी त्यांचे येथे स्वागत केले. प्रशासनाच्या दृष्टीने नगर जिल्हय़ात शिकण्यासारखे खूप आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यास आपले प्राधान्य राहील. विभागनिहाय माहिती घेऊन पुढील कामाची दिशा ठरवू असे ते म्हणाले.