चंदगड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखेरीस संध्यादेवी कुपेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा हा निर्णय जाहीर झाल्यानंतर काही पक्षांकडून निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीने विचार होऊ लागला आहे. तर काही पक्षांनी निवडणूक तडफेने लढविण्याचा निर्धार केला आहे. बाबासाहेब कुपेकर यांच्या पश्चात संध्यादेवी कुपेकर या प्रथमच राजकारणात पहिले पाऊल टाकीत असून, त्यांचे पदार्पण कसे होते याकडे जिल्हय़ाचे लक्ष वेधले आहे.    
विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांचे निधन झाल्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे. सुरुवातीच्या काळात कुपेकर यांचे पुतणे संग्रामसिंह कुपेकर यांना उमेदवारी मिळेल असे वातावरण होते. मात्र गेल्या पंधरवडय़ात हे चित्र अचानक पालटले. कुपेकरांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी संध्यादेवी कुपेकर यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह राष्ट्रवादीचे नेते केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे धरला. दोन्ही उमेदवारांची तुलना करीत कार्यकर्त्यांनी संध्यादेवी कुपेकर यांची उमेदवारी कशी प्रभावी राहील, याचे विश्लेषण केले. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी आज मुंबईत संध्यादेवी कुपेकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला.
संध्यादेवी कुपेकर यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती वृत्तवाहिन्यांवरून कळल्यानंतर कुपेकर यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी निवासस्थानी गर्दी केली. राजकीय घराण्यात असूनही राजकारणापासून अलिप्त असलेल्या संध्यादेवी कुपेकर या प्रथमच कार्यकर्त्यांना आज मोकळेपणाने भेटताना दिसल्या. कार्यकर्त्यांनी बाबासाहेब कुपेकर यांच्याप्रमाणे त्यांचीही पाठराखण करण्याचा शब्द दिला. तर कार्यकर्त्यांशी बोलताना कुपेकर म्हणाल्या, स्व. बाबासाहेब कुपेकर यांचे विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे. जिल्हय़ातील सर्व नेत्यांच्या सहकार्याने निवडणुकीत उतरून यश मिळवायचे आहे. गतवेळी चंदगड विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील फक्त चार जिल्हा परिषद मतदारसंघ होते. तरीही चंदगडच्या जनतेने तेथील तीन उमेदवार असतानाही बाबासाहेबांना साथ दिली होती. या मतदारसंघाचा विकास करण्याचे स्वप्न बाबांच्या जाण्याने अपूर्ण राहिले आहे, ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया.    
संध्यादेवी कुपेकर यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीचे समीकरण बदलताना दिसत आहे. काही पक्षांनी अवघ्या दीड वर्षांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर काही पक्षांनी निवडणूक ही होणारच असे स्पष्ट संकेत दिले आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी पक्षाकडे सातजण इच्छुक असून त्यातील सक्षम उमेदवार निवडणुकीत उतरविणार असल्याचे सांगितले. जनसुराज्यशक्ती, जनता दल, सर्व श्रमिक संघ या पक्षांकडून कोणत्या हालचाली होणार याकडे आता लक्ष वेधले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार के. पी. पाटील, मतदारसंघातील तीन तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील, एम. जे. पाटील, मुकुंद आजरे यांना मुंबईला चर्चेसाठी तातडीने बोलावून घेतले होते. प्रांत कार्यालयात पिचड यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी आमदार पाटील व तालुक्याध्यक्षांनी बऱ्याच मुद्यांचा ऊहापोह केला. त्यानंतर सायंकाळी संध्यादेवी कुपेकर यांची उमेदवारी जाहीर झाली. या निर्णयाचे स्वागत करून आमदार पाटील यांनी अल्पकाळासाठी होणारी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यासाठी इतर पक्षांनीही सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncps candidature for sandhya devi kupekar by election in chandgarh vidhan sabha
First published on: 29-01-2013 at 09:08 IST