* पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांनाही धडे
* शालेय शिक्षणासाठी ‘एज्युमीडिया’चा अभ्यासक्रम
शालेय शिक्षणात प्रत्येकाला ‘नैतिक शिक्षणा’च्या तासाला सामोरे जावे लागले आहे. शिक्षक किंवा शिक्षिका त्या तासाला विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांबाबत ‘बाळकडू’ पाजण्याचे काम करतात. मात्र आता हेच बाळकडू चित्रपटाद्वारे पाजण्याचा ट्रेंड रूढ होत आहे. एज्युमीडिया या संस्थेतर्फे देशभरातील ३०० शाळांमध्ये नैतिक मूल्यांचे हे धडे छोटय़ाछोटय़ा चित्रपटांद्वारे दिले जात आहेत. विशेष म्हणजे या संस्थेने शाळांच्या हातात हात घालून मूल्यशिक्षणाचा एक अभ्यासक्रम तयार केला असून त्या अभ्यासक्रमात पालक व शिक्षक यांच्यासाठीही काही ‘धडे’ ठेवण्यात आले आहेत. हा सर्व अभ्यासक्रम विविध विषयांवरील चित्रपटांवर आधारित आहे.फळा आणि खडू यांच्या सहाय्याने लहान मुलांना एखादी गोष्ट शिकवण्यापेक्षा तीच गोष्ट त्यांना दृक्श्राव्य माध्यमातून दाखवली, तर ती लवकर कळते. त्याचप्रमाणे शालेय वयातील मुलांना अनेक गोष्टींबद्दल कुतूहलही असते. त्यांचे हे कुतूहल योग्य मार्गाने शमवण्यासाठी आम्ही ‘स्कूल सिनेमा’ ही संकल्पना अमलात आणली आहे, असे एज्युमीडियाच्या तबस्सुम मोदी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. याआधी आम्ही एज्युमीडियातर्फे व्याख्याने देऊन मूल्यशिक्षणाचे काम करत होतो. त्या वेळी आम्ही एका वेळी एकाच वर्गापर्यंत पोहोचू शकत होतो. मात्र आता चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही एकाच वेळी देशभरातील ३०० शाळांमध्ये पोहोचत आहोत. या अभ्यासक्रमात पहिली ते आठवी या इयत्तांमधील मुलांच्या भावनांकाचा आणि बुद्धय़ांकाचा विचार करून प्रत्येक इयत्तेसाठी दहा वेगवेगळ्या विषयांवरील दहा चित्रपट समाविष्ट करण्यात आले आहेत. वर्षभरात हे चित्रपट त्या मुलांना दाखवले जातात. ते चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्यात त्यावर चर्चा घडवली जाते. त्याचप्रमाणे त्या चित्रपटातील मूल्याशी संबंधित एखादा उपक्रम त्या मुलांकडून करून घेतला जातो. तसेच पालक व शिक्षक यांनाही असे चित्रपट दाखवले जातात. त्यांच्याकडूनही काही धडे गिरवून घेतले जातात. या अभ्यासक्रमात पहिली, दुसरी वगैरे इयत्तांमधील मुलांना झेपतील अशा ऐक्य, विचारांची देवाणघेवाण, संवेदनशीलता, सांघिक भावना अशा अनेक मूल्यांवर आधारित चित्रपटांपासून ते आठवीतील मुलांना झेपतील अशा प्रामाणिकपणा, शिवराळ भाषा, लैंगिक जाणीवा, सहिष्णुता, देशभक्ती या मूल्यांवरील चित्रपटांचा समावेश आहे. सध्या हा अभ्यासक्रम केवळ देशभरातील ३०० खासगी शाळांमध्ये सुरू आहे. या अभ्यासक्रमासाठी शाळेतील प्रत्येक मुलाकडून वर्षांचे ३६० रुपये आकारले जातात. सध्या हे सर्व चित्रपट प्रामुख्याने हिंदी भाषेत आहेत. मात्र ही संकल्पना तळापर्यंत पोहोचवण्यासाठी हे चित्रपट प्रादेशिक भाषांतून येण्याची गरज आहे आणि त्यासाठी राज्य सरकारांची मदत अत्यावश्यक आहे, असे मोदी यांनी सांगितले.