समाजातील अनिष्ट रुढी आणि परंपरांवर आपल्या अभंगांमधून आसूड ओढून समाजात जनजागृती करणारे संत, हे त्या काळातील सामाजिक सुधारणांचे खंदे पुरस्कर्तेच होते. अनेक संतांच्या रचना, ओव्या आणि अभंग  आपल्याकडे पिढय़ान्पिढय़ा मुखोद्गत आहेत. या ग्रंथांचे पारायण, सामूहिक वाचनही केले जाते. राज्य मराठी विकास संस्थेने आता हे ग्रंथ ‘बोलक्या’स्वरूपात सादर करण्याचे ठरविले आहे.
संस्थेने समर्थ रामदास स्वामींचा ‘दासबोध’ ‘बोलक्या’ स्वरूपात यापूर्वीच  प्रकाशित केला असून आता तुकाराम महाराजांची ‘गाथा’ आणि संत ज्ञानेश्वरांची ‘ज्ञानेश्वरी’ ‘बोलकी’ करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.  संस्थेचे संचालक डॉ. अशोक सोलनकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, ‘दासबोधा’च्या ध्वनिफिती लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक संजीव अभ्यंकर यांच्या आवाजात ‘दासबोध’ सादर करण्यात आला असून त्याच्या पाच हजार ध्वनिफिती तयार करण्यात आल्या आहेत.
या पाठोपाठ आता गाथा आणि ज्ञानेश्वरी बोलक्या स्वरूपात आणण्यासंदर्भातील सर्व आराखडा संस्थेने राज्य शासनाला सादर केला असून राज्य शासनाच्या मान्यतेनंतर हे काम हाती घेण्यात येईल, असेही डॉ. सोलनकर यांनी सांगितले. याच श्राव्य उपक्रमाअंतर्गत यानंतर राज्य शासनाने प्रकाशित केलेले काही महत्त्वाचे ग्रंथ तसेच मराठी भाषेसाठी साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळालेल्या काही पुस्तकांचेही श्राव्य रूपांतर केले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now tukaram gatha and dnyaneshwari will talk
First published on: 09-04-2013 at 01:01 IST