उरण येथील समुद्रात मोठय़ा प्रमाणात काळ्या रंगाच्या तेलाचा तवंग तरंगत आहे. हे तेल केगांव व पिरवाडीच्या किनारपट्टीवर जमा होऊ लागल्याने चिकट थर साचला आहे. किनारा काळवंडला असून किनाऱ्यावर येणाऱ्या या तेलतवंगामुळे प्रदूषण निर्माण होत आहे. स्थानिक मासेमारांनी हा तवंग तातडीने दूर करण्याची मागणी केलेली आहे.
तीन वर्षांपूर्वी जेएनपीटी बंदराशेजारी झालेल्या दोन जहाजांच्या टकरीनंतर जहाजातील लाखो लिटर तेल उरण परिसरातील किनाऱ्यावर पसरले होते. घारापुरी बेटाला तर या तेलाने वेढाच घातला होता. त्यामुळे किनाऱ्यावरील मासेमारी करणाऱ्यांची मासळी खरेदी केली जात नसल्याने तीन ते चार महिने येथील मासेमारांवर संकट आले होते. त्यानंतर ओएनजीसीच्या प्रकल्पातून तेलाची गळती झाल्याने किनाऱ्यावर प्रदूषण झालेले होते. सध्या मासेमारीवर बंदी असली तरी अनेक मोठय़ा बोटीतील तेल समुद्रातून वाहत किनाऱ्यावर येत असल्याने किनाऱ्यावर तेलतवंगाचे प्रदूषण निर्माण होऊ लागले आहे. याचा परिणाम या परिसरातील नागरिकांवरही होत असल्याचे मत केगांव दांडा येथील रहिवासी भरत पाटील यांनी व्यक्त केले आहे.