काळेवाडी येथील एका धार्मिक कार्यक्रमात देण्यात आलेल्या प्रसादातून विषबाधा झालेल्यांपैकी एक तरुणाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेतील आणखी दोघांची प्रकृती गंभीर असून, इतर सुमारे पन्नासहून अधिक लोक यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
विजय शरणप्पा निंबाळकर (वय २२, रा. ओटास्कीम, निगडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. २ फेब्रुवारीला काळेवाडीतील कोकणेनगर येथे कर्नाटकातील देवीच्या उत्सवाचा कार्यक्रम होता. त्यानिमित्त मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत उपस्थित नागरिकांना भात, आमटी व शिऱ्याचा प्रसाद देण्यात आला. मात्र प्रसाद खाल्ल्यानंतर नागरिकांना उलटय़ा होऊ लागल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. इतर नागरिकांनी विषबाधा झालेल्या लोकांना तातडीने शहरातील विविध रुग्णालयात हलविले. त्यातील निंबाळकर याच्यावर चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याचा सोमवारी मृत्यू झाला. विषबाधा झालेल्यांमध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश आहे. त्यातील दोनजणांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे. चव्हाण रुग्णालयात सध्या ४७ जणांवर उपचार सुरू आहेत. घटनेच्या दिवशी पोलिसांनी प्रसादाचे नमुने घेतले आहेत. आता या प्रकरणात मृत्यू झाल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.