स्थळ : ठाण्यातील संघाची एक शाखा. नेहमीचे बौद्धिक संपून बैठक आटोपली. स्वयंसेवकांची नेहमीच्या शिस्तीत पांगापांग झाली. एरवी लागलीच शाखेबाहेर जाणारा बंडय़ा मात्र त्यादिवशी सभागृहातच घुटमळत राहिला. संघटक अण्णांच्या चाणाक्ष नजरेतून ते सुटले नाही.
अण्णा : काय रे बंडय़ा ?  आज इतका अस्वस्थ का आहेस ? काय झाले ?
बंडय़ा : काही नाही अण्णा, काही प्रश्न पडलेत. मगाशी बैठकीतच विचारणार होतो, पण म्हटलं जाऊ दे.
अण्णा : अरे त्यात काय ? विचारायचे की. स्वयंसेवकाने मनात कोणतीही शंका ठेवायची नाही. सरळ तिचे निरसन करून घ्यायचे. मग मन अगदी स्वच्छ होते, आंघोळ केल्यासारखे.
बंडय़ा : बरं अण्णा मग विचारतोच. अच्छे दिन आल्यावर आपले राजकीय धोरण खूपच बदललंय, असे नाही वाटत तुम्हाला?
अण्णा : आपला राजकारणाशी काय संबंध ? आपण स्वयंसेवक. राजकारण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आहे की. आपले वैचारिक आणि नैतिक अधिष्ठान त्या पक्षाच्या पाठीशी आहे इतकेच.
बंडय़ा : अण्णा ते मला माहिती आहे, पण सध्या भाजपमध्ये जे काही सुरू आहे ते आपल्या नैतिक अधिष्ठानात बसते का ?
अण्णा : म्हणजे? मोघम नको स्पष्ट बोल.
बंडय़ा : लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये लाट असूनही आपल्याला ठाण्यात निवडून येण्याची क्षमता या निकषावर बाहेरून उमेदवार आयात करावे लागले. विधानसभा निवडणुकीत तर चक्क ‘भाजपात या आणि तिकीट मिळवा’, अशी खुली ऑफरच होती. आता तोच कित्ता आपण पालिका निवडणुकीतही गिरविणार असलो तर आपल्या माणसांना कशी संधी मिळणार ? त्यांनी काय सदा सर्व काळ नि:स्पृहपणे फक्त सतरंजा उचलण्याचेच काम करायचे का?
अण्णा : बंडय़ा लाट जोरकस असली तरी क्षणिक असते. आता मिळालेले यश भविष्यात टिकवून ठेवण्यासाठी आपली शक्ती आणि ताकद वाढवावी लागणार आहे. वेळप्रसंगी स्वत: गैरसोय सोसून आपण घरातल्या पाहुण्यांची आपण नीट सरबराई करतोच की नाही? हे अगदी तसेच आहे.
बंडय़ा : ठीक आहे अण्णा, पण ठाण्यात जास्त जागा मिळाल्या होत्या ना आपल्याला? मग पालकमंत्रिपद त्यांना का? हे म्हणजे युद्धात जिंकून तहात हरल्यासारखे झाले.
अण्णा : अरे, जागा वाटपावरून काही मतभेद झाले असतील, पण एक लक्षात ठेव ते आपले समविचारी आहेत.
बंडय़ा : अहो, अण्णा कसला समविचार घेऊन बसलात? कायम विषमतेने वागत आलेत हे आपल्याशी.
अण्णा : मुला तुझ्या भावना मी समजू शकतो, पण राजकारणात असा उतावीळपणा चालत नाही. संयम बाळगावा लागतो. परिस्थिती बदलायला वेळ लागतो.
बंडय़ा : परिस्थिती बदलेल की नाही माहीत नाही, आपण मात्र पूर्ण बदललोय अण्णा.
अण्णा : काळानुरूप बदलायलाच हवे. ‘कालाय तस्मै नम:’
बंडय़ा : हो कबूल आहे अण्णा, पण किती बदलायचे? काल परवापर्यंत घडय़ाळ्याचे राखणदार असलेले कपिल पाटील कमळ हाती घेऊन झेडपीतून थेट खासदार झाले. आमदार किसन कथोरे, मंदा म्हात्रे भाजपमध्ये आहेत, हे अजूनही खरे वाटत नाही. त्यात आता काय तर माजी पालकमंत्री गणेश नाईकही भाजपमध्ये येत असल्याचे परवा कुणीतरी सांगत होते. अरे काय चाललंय काय?
अण्णा : तुझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकणार नाही. मुळत तुला इतके प्रश्न पडणे हे स्वयंसेवकाच्या दृष्टीने चांगले की वाईट हेही मी ठरवू शकत नाही. पुढच्या बैठकीत याबाबत सविस्तर चिंतन करू. आता घरी जा. बराच उशीर झालाय..
 महादेव श्रीस्थानकर