महानगरपालिकेतील विविध समित्या तातडीने स्थापन करण्यासाठी विरोधकांनी आता हालचाली सुरू केल्या आहेत. विरोधी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीने याबाबत थेट विभागीय महसूल आयुक्तांना याबाबत निवेदन पाठवले आहे.
मनपातील भाजपचे गटनेते आसाराम कावरे व शिवसेना-अपक्ष आघाडीचे गटनेते संजय शेंडगे यांनी विभागीय महसूल आयुक्तांना याबाबत संयुक्त निवेदन पाठवले आहे. मनपाची पंचवार्षिक निवडणूक होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र मनपात स्थायीसारख्या महत्त्वाच्या समितीसह महिला बालकल्याण समितीही स्थापन झालेली नाही. त्यामुळे या समित्यांविना या विभागाशी निगडित कामे रेंगाळली असून, त्याचा विपरीत परिणाम मनपाच्या एकूणच कामकाजावर झाला आहे. हा विस्कळीतपणा दूर करून मनपाच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी या समित्या तातडीने स्थापन कराव्या अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
मनपाची पंचवार्षिक निवडणूक दि. १५ डिसेंबरला झाली. त्यानंतर पंधरा दिवसांनी महापौर व उपमहापौरांचीही निवड झाली. त्यालाही आता महिना होऊन गेला, मात्र मनपात अन्य कोणत्याच समित्या स्थापन झालेल्या नाहीत. त्यामुळेच विरोधकांमध्ये आता अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवाय स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने मनपाची अनेक कामेही रखडली आहेत. सत्ताधा-यांनी स्वीकृत सदस्यांच्याही निवडी लांबणीवर टाकल्या असून त्यामुळे त्यांच्या पक्षातही इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे.
मनपाची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेच्या विभागीय महसूल आयुक्तांकडील गटनोंदणीला सुरुवातीला विलंब झाला. सुरुवातीच्या काळात त्यामुळे समित्यांच्या नियुक्त्या रखडल्या. मात्र शिवसेनेची गटनोंदणी होऊन त्याचा अहवालही मनपाला प्राप्त झाला, मात्र मनपातील सत्ताधा-यांनी आता या निवडींसाठी चालढकल सुरू केली आहे. स्थायी समितीअभावी पारगमन वसुलीसाठी नव्या ठेकेदाराची नियुक्ती त्यामुळे रखडली असून जुन्याच ठेकेदाराला मुदतवाढ देऊन हा विषय लांबवला जात आहे.
 अंदाजपत्रकाबाबतही चिंता
मनपाचे अंदाजपत्रकही तोंडावर आले आहे. प्रशासनाने दिलेल्या अंदाजपत्रकावर स्थायी समितीत चर्चा होऊन दुरुस्त्या केल्या जातात, स्थायी समिती हे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेपुढे सादर करते. तेथे अंदाजपत्रकाला मंजुरी दिली जाते. मात्र मनपात अजूनही स्थायी समितीच अस्तित्वात नसल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opponents request to revenue commissioner
First published on: 08-02-2014 at 03:16 IST