आधारचे काम करणा-या एका कर्मचा-यास रेल्वेच्या मालधक्क्याजवळ शुक्रवारी रात्री ९.३० वाजता चौघांनी लुटले. पण आजूबाजूच्या लोकांनी या तरुणाची गुन्हेगारांच्या तावडीतून सुटका करून दोघा लुटारूंना पकडून पोलिसांच्या हवाली केले. तर दोघे पळून गेले. त्यापैकी एकाला आज पोलिसांनी अटक केली.
वळदगाव येथील सचिन शंकर काळे (वय २७) हे आधार ओळखपत्र तयार करण्याचे काम करतात. ते रात्री झेलम एक्सप्रेसने नगरहून आले. मालधक्कामार्गे बसस्थानकाकडे जात असताना त्यांना चौघांनी अडवले. मारहाण करत त्यांच्या खिशातील दोन मोबाइल, पैसे व नेटसेटर काढून घेतले. काळे यांनी आरडाओरडा सुरू करताच आजूबाजूचे लोक धावले. त्यांनी काळे यांची सुटका केली. दोघा गुन्हेगारांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. तर दोघे फरार झाले. त्यापैकी एकास पकडण्यात आले. गुन्हेगार हे फकीरवाडा भागातील असून ते रेल्वेत लूटमारीचा धंदा करतात. त्यांच्याविरुद्ध पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सलमान अब्बासखान पठाण, अजित अन्वर पठाण, इम्रान अमजद पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. शादाब मस्तान पठाण हा आरोपी फरार आहे.