कष्टाचा पैसा, पुण्याई व जीवन विद्य्ोचे शहाणपण या त्रिसूत्रीने सुखी जीवन जगता येईल असा विश्वास सद्गुरू वामनराव पै यांचे सुपुत्र प्रल्हादराव (दादा) पै यांनी दिला.
येथील सुपर मार्केटशेजारील अयोध्यानगरीमध्ये आयोजित समाजप्रबोधन महोत्सवात ते बोलत होते. ‘कौटुंबिक जीवन’ व आरोग्यासाठी जास्त पैसा मिळवताना पथ्ये पाळण्याची आवश्यकता त्यांनी मांडली. आरोग्य राखणे व मुलांकडे लक्ष्य देणे महत्त्वाचे आहे. लोक खूप काम करतात व आरोग्य बिघडते. जगायला पैसा कमी लागतो पण मौजमस्तीसाठी पैसा जास्त लागतो. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या गरजा आहेत. चैन चंगळ, मौजमस्तीसाठी कोटींचा पैसा लागतो. पाणी व अन्न ही राष्ट्राची संपत्ती आहे. ती वाया घालवू नका. गोरगरिबांना अन्न द्या. बायको, नवरा, आई-वडील मुले, आरोग्य ही प्रॉपर्टी आहे. मुलांना चांगले शिक्षण द्यावे. शरीर हा दिव्य संगणक आहे त्याला चांगले खाणे, पिणे हे फिडिंग दिले पाहिजे. विचारांचे संस्कार पेशीवर होत असतात असा शोध शास्त्रज्ञांना लागलेला आहे. गाठीपाठी पुण्य असेल तर सुखी जीवन जगता येते. पुण्याई संपली की संकटे यायला लागतात असे पै यांनी सांगितले. जिथे पैसा उपयोगी पडत नाही तेथे पुण्य उपयोगी पडते. चांगले शेजारी, चांगली बायको, चांगला नवरा, मुले, चांगला जावई पुण्याईने मिळतात. पुण्याईने जे मिळते ते टिकवण्यासाठी ‘शहाणपण’ लागते. हे शहाणपण देण्याचे कार्य जीवनविद्या मिशन करते. स्त्री हीच स्त्रीची शत्रू होते, हेच दुर्दैव आहे. स्त्रीला दु:ख दिले तर दैन्य आणि दु:ख घरी येते हे लक्षात ठेवून स्त्रीला घरात सन्मान द्या. आठ वर्षांपर्यंत मुलांवर चांगले संस्कार होणे महत्त्वाचे आहे. सवयी खूप महत्त्वाच्या आहेत. मुलांना चांगली संगत मिळेल याकडे लक्ष दिले पाहिजे. कृतज्ञता हे पुण्य आहे, शहाणपण आहे म्हणून बाहेरून आतून कृतज्ञता पाहिजे. बाहेरून म्हणजे कौतुक करणे व आतून म्हणजे ‘देवा याचे भले कर’ असे सतत म्हणत राहणे. ‘द्या आणि सोडून द्या’ हा पॅटर्न वापरा. मान द्या, कौतुक करा आणि सुख द्या. थोडेसे मान-अपमान सोडून द्या. शेवटी त्यांनी सुखी जीवनाचा पासवर्ड दिला तो म्हणजे कृतज्ञता व पैसा म्हणजे पै ची साथ.
कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते, कृषिभूषण शेतकरी शंकरराव खोत, नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे, जयंत गुंदेशा, मंदार कवठेकर आदी मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती. सुखसंवाद, नामसंकिर्तन, हरिपाठ असे कार्यक्रमही पार पडले. निवेदन सुनीता शेंबडे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pralhadrao pai gives tips for happy life
First published on: 25-02-2013 at 07:56 IST