‘शहरी पाणीपुरवठा, सद्य:स्थिती आणि आव्हाने’ या विषयावर शनिवारी (दि. १३) औरंगाबाद सोशल फोरम, स्वामी रामानंदतीर्थ रीसर्च इन्स्टिटय़ूट, टाटा सामाजिक विज्ञान संस्था व प्रयास यांच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिकीकरणानंतर खासगीकरणाची प्रक्रिया पाणी क्षेत्रापर्यंत येऊन पोहोचली. पाणी ही व्यवहाराची वस्तू या तत्त्वाचा सरकारने धोरणात्मक पातळीवर अंगीकार केल्यानंतर पाणी विक्री हे क्षेत्र कंपन्यांना खुले झाले. नव्या प्रणालीत शहरी पाणीपुरवठय़ाची स्थिती समजून घ्यावी, यासाठी चार सत्रांत विषयाची चर्चा होणार आहे.
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतर्फे याबाबत सादरीकरण होईल. या वेळी मराठवाडय़ातील पाण्याच्या खासगीकरणाच्या प्रयोगावर चर्चा होणार असून, औरंगाबाद शहरातील समांतर पाणीपुरवठा योजनेची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. पानझडे देणार आहेत. या पाणीपुरवठा योजनेचे विश्लेषण पुणे येथील प्रयास संस्थेमार्फत केले जाणार आहे.
लातूरलाही पाण्याच्या खासगीकरणाचे प्रयोग झाले. त्याला मोठा विरोध झाला. लातूर पाणीपुरवठा खासगीकरणविरोधी अभियानातील सदस्य अतुल देऊळगावकर, अमोल गोवंडे व अशोक गोविंदपूरकर दुसऱ्या सत्रात त्यांचे मत मांडणार आहेत. औरंगाबाद शहरातील नागरी व औद्योगिक पाण्याचा वापर- सद्य:स्थिती व नियोजनाचा प्रश्न यावर मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे मुकुंद कुलकर्णी यांचे सत्र असून, औरंगाबादमधील वाढते नागरीकरण व पाण्याची उपलब्धता यावर प्रदीप पुरंदरे बोलणार आहेत.
पाणीपुरवठय़ाला पूरक पर्याय यावर विजय दिवाण सादरीकरण करणार असून, दिवसभराच्या चर्चेनंतर धोरणात्मक पर्याय आणि पुढील दिशा ठरविली जाणार आहे.