भाजप-शिवसेनेची युती २२ वर्षांपूर्वीची आहे, त्यामुळे वाद मिटतील. येत्या दोन दिवसांत सगळे सुरळीत होईल असे भाजपचे प्रदेश निरीक्षक रघुनाथ कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यासाठी काही उपाय ठरले आहेत असे स्पष्ट करताना आमदार अनिल राठोड यांच्या मूळ आक्षेपांवर मात्र ते कोणतेच समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.
महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कुलकर्णी मंगळवारी रात्री येथे आले. आज दिवसभर त्यांनी राठोड तसेच भाजपची स्थानिक समिती व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेतून काय निष्पन्न झाले हे मात्र ते ठामपणे काहीच सांगू शकले नाही. युतीतील वाद वरिष्ठ पातळीवर मिटतील असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले, नगर शहरातील युतीचे जागावाटप वरिष्ठांच्या संमतीने मुंबईत झाले आहे. जागावाटपाचे सूत्रही मुंबईतच ठरले. उमेदवारी वाटपानंतर मात्र वाद झाले असले, तरी आता ते मिटतील. राठोड यांनी आक्षेप घेतलेल्या ११ जागांबाबतचा विषयही वरिष्ठ पातळीवर सुटेल. येत्या एकदोन दिवसांतच युतीच्या संयुक्त प्रचाराचा शुभारंभ होईल असेही ते म्हणाले.
याबाबत काही गोष्टींवर उपाय शोधण्यात आले आहेत असे सांगण्याचा प्रयत्न कुलकर्णी यांनी केला, मात्र त्याचा तपशील ते सांगू शकले नाहीत. पण पक्षाच्या स्थानिक समितीने कोणताही चुकीचा निर्णय घेतला नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. या समितीने एकमतानेच उमेदवार ठरवले असून त्यावर इतरांना आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही असे स्पष्ट करून त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे समर्थन केले. पक्षाच्या स्थानिक समितीचे सदस्य व अन्य पदाधिकारीही या वेळी उपस्थित होते.