ज्येष्ठ साहित्यिक आणि राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषद आणि सारस्वत बँक यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २७ एप्रिल रोजी अभीष्टचिंतन सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते ९ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात कर्णिक यांच्या सत्काराबरोबरच अन्य विविध कार्यक्रमही होणार आहेत.
दादर (पश्चिम) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांच्या हस्ते ‘कोमसाप’च्या संकेतस्थळाचे उद्घाटन होणार आहे. डॉ. महेश केळुस्कर हे ‘करुळचा मुलगा-निष्कंप सरोवर’ चे अभिवाचन करणार असून ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर आणि लेखिका-समिक्षिका डॉ. विजया राजाध्यक्ष कर्णिक यांच्याविषयीच्या वाङ्मयीन आठवणी सांगणार आहेत.
या कार्यक्रमापूर्वी कर्णिक यांच्या हस्ते ‘खेळघर’ (रवींद्र रुक्मिीणी पंढरीनाथ), ‘आनंद तरंग’ (रेखा नार्वेकर), ‘सुखाची दारं’ (प्रा. विश्वास वसेकर) या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. ‘कोमसाप’ची नवी भरारी या विषयावर डॉ. महेश केळुस्कर यांच्याशी संवाद, मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘काळवीट’ या कथेचे किशोर पेंढरकर, अंजली पेंढरकर, प्रमोद पवार यांनी केलेले अभिवाचन, संगीतकार नीळकंठ गोखले यांचा ‘म्युझिकल झिम्मा’ आदी कार्यक्रमही या वेळी होणार आहेत.
कर्णिक अभिष्टचिंतन सोहोळ्यासाठी कोणीही भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ आणू नयेत. त्या ऐवजी कार्यक्रमस्थळी ठेवलेल्या दानपेटीत यथाशक्ती रक्कम दान करावी. दानपेटीत जमा झालेली रक्कम राज्यातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार आहे, असे आवाहन ‘कोमसाप’ने केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Program for 80th birthday of madhu mangesh karnik
First published on: 25-04-2013 at 02:01 IST