राष्ट्रीय विधी विद्यापीठ औरंगाबादला व्हावे, या साठी मराठवाडय़ातील आमदार आक्रमक झाले. विधानभवनासमोर मराठवाडय़ातील सर्वपक्षीय आमदारांनी औरंगाबादला विधी विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.
राज्य मंत्रिमंडळाने औरंगाबाद येथे विधी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, औरंगाबादऐवजी मुंबई येथे ते विद्यापीठ नेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यास मराठवाडय़ातील आमदारांनी जोरदार विरोध केला.
सरकारच्या वतीने २०१२-१३ या शैक्षणिक वर्षांपासून विधी विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेतला व तो काही तासातच फिरवला. चार वर्षांपूर्वी घोषणा होऊनही या अनुषंगाने राज्य सरकारने काहीच कार्यवाही करीत नसल्याचा आरोप आमदार सतीश चव्हाण यांनी केला. वारंवार विनंती करूनही शासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे, असेही ते म्हणाले.
मराठवाडय़ातील सर्वपक्षीय आमदारांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मंगळवारी चर्चा केली. आंदोलनात आमदार चव्हाण, दिलीप देशमुख, आर. एम. वाणी, प्रदीप जैस्वाल, विक्रम काळे, एम. एम. शेख, विनायक मेटे, ज्ञानराज चौगुले, बंडू जाधव, सुरेश नवले, प्रशांत बंब, संजय वाकचौरे, सुरेश जेथलिया, हनुमंतराव बेटमोगरेकर, अमरसिंह पंडित, वैजीनाथ शिंदे, पृथ्वीराज साठे आदी सहभागी झाले होते.