कल्याण शहरातील वाहतुकीला कलाटणी देऊ शकेल, अशा गोविंदवाडी रस्त्याचे काम दोन र्वष होऊनही अद्याप पूर्ण झालेले नाही. या रस्त्याच्या कामातील काही अडथळे दूर करण्यात संबंधित यंत्रणांना यश येत नसल्यामुळे हे काम रडतखडत सुरू असल्याचे बोलले जाते. या रस्त्यासाठी १५ कोटी ४२ लाखांचा खर्च प्रस्तावित आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हे रस्ते काम सुरू आहे. गोविंदवाडी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शिळफाटा-पत्रीपूल ते शिवाजी चौकमार्गे भिवंडी या रस्त्यावरील वाहतूक पत्रीपूल-गोविंदवाडी रस्ता ते दुर्गाडी चौक या मार्गाने होणार आहे. त्यामुळे गोंविदवाडी रस्त्याचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. असे असताना रस्त्याची रडकथा सुरूच आहे.
सततच्या होणाऱ्या अपघातामुळे चार वर्षांपूर्वी गोविंदवाडी रस्त्याचा पर्याय महापालिका प्रशासनाने पुढे आणला. महापालिकेने पत्रीपूल ते दुर्गाडी किल्ला दरम्यानच्या प्रस्तावित रस्त्याच्या जागेत घरे, अतिक्रमणे, तबेले होते त्यांचे पुनर्वसन केले. काही अतिक्रमणे महापालिकेने पाडून टाकली. माजी आयुक्त राम शिंदे यांच्या काळात कोन (भिवंडी) ते शिळफाटा रस्त्याचे पुनर्पृष्ठीकरण करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तयार करण्यात आला. या रस्ते कामाला पालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी हवी होती. त्यामुळे ही मंजुरी देताना महामंडळाने गोविंदवाडी रस्ता बांधून द्यावा, असा ठराव महापालिकेत करण्यात आला. त्यानुसार गोंविदवाडी रस्त्याचे कामही पूर्ण झाले. कोन ते शिळफाटा रस्त्याचे पुनर्पृष्ठीकरण पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर महामंडळ टोल वसुली करीत आहे. असे असताना गोविंदवाडी रस्त्याचे काम मात्र रखडलेल्या स्थितीत आहे. जेमतेम एक किलोमीटरच्या रस्त्यावरील बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. या कामात अजूनही बेकायदा बांधकामांचा अडथळा आहे. शिळफाटा रस्ते पुनर्पृष्ठीकरणाच्या कामात ठाण्यातील एका वजनदार राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याचा सक्रिय सहभाग होता, असे बोलले जाते. ज्यावेळी हे काम सुरू झाले तेव्हा कल्याण महापालिकेत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचा महापौर होता. या रस्त्याचे काम सुरू होताच त्याचे श्रेय घेण्यासाठी धडपडणारे या पक्षाचे नेते आता मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत. भाजपचे माजी आमदार संजय केळकर यांनी ऑगस्ट २०११ मध्ये गोंविदवाडी रस्त्याच्या प्रश् नावर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी गोविंदवाडी रस्त्याचे काम १ ऑक्टोबर २०११ पर्यंत सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. गोविंदवाडी रस्त्याच्या प्रश्नावर भाजपने आंदोलन केले होते. पुढे विधान परिषदेच्या निवडणुकीत केळकर यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. त्यानंतर केळकर आणि भाजपमधील त्यांचे सहकारी असे सगळेच गायब झाले. कल्याणमधील शिवसेनेच्या नेत्यांना या कामाविषयी काही देणे-घेणे नसल्यासारखे चित्र आहे. एकूणच रखडलेल्या गोिवदवाडी रस्त्याविषयी लोकप्रतिनिधींचे मौन संतापजनक आहे.