शेकापकडून मिळालेली उमेदवारी ऐनवेळी कापल्याने नाराज झालेल्या भाऊसाहेब रूपनर यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सांगोला विधानसभा मतदारसंघातून आमदार गणपतराव देशमुख यांचा राजकीय वारसदार म्हणून भाऊसाहेब रूपनर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, शेकाप कार्यकर्त्यांनी याला विरोध करत गणपतराव देशमुख यांच्या मुलाला उमेदवारी देण्याचा हट्ट धरला. त्यानंतर पक्षाने निर्णय बदलला.

दोन निवडणुका सोडता राज्याच्या पहिल्या निवडणुकीपासून सांगोल्याचे आमदार असलेल्या गणपतराव देशमुख यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण? याबद्दल चर्चा सुरू झाली होती. भाऊसाहेब रूपनर आणि गणपतराव देशमुख यांचा मुलगा डॉ. अनिकेत देशमुख ही दोन नावे चर्चे होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कामगार पक्षाने भाऊसाहेब रुपनर यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, यावरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट होती. स्वतः गणपतराव देशमुख यांनी निवडणूक लढवावी किंवा त्यांचे पुत्र डॉ. अनिकेत देशमुख यांना उमेदवारी द्यावी, असा हट्ट कार्यकर्त्यांनी लावून धरला होता.

शेकापकडून उमेदवारी पक्की झाल्याने भाऊसाहेब रूपनर यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मात्र, कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठीवर देशमुख यांच्या मुलालाच उमेदवारी देण्यात यावी यासाठी दबाव आणला. शेवटी कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे पक्षाला उमेदवार बदण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर डॉ. अनिकेत देशमुख यांच्या नावाची घोषणा पक्षाने केली. त्यामुळे नाराज झालेल्या भाऊसाहेब रूपनर यांनी तडकाफडकी शेकापचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. रात्रीतूनच मुंबई गाठत त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

…म्हणून कार्यकर्त्यांचा रूपनर यांना विरोध-

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब रुपनर यांचे बंधू संजय रुपनर यांनी शेकापला न जुमानता आमदार गणपतराव देशमुख यांच्याविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नंतर त्यांनी तो अर्ज मागे घेतला. मात्र, शेकाप कार्यकर्ते यामुळे सावध झाले होते. यावेळी भाऊसाहेब रूपनर वेगळा विचार करतील, अशी शंका आल्याने कार्यकर्त्यांनी रूपनर यांच्या नावाला सुरूवातीपासून विरोध सुरू केला होता.