कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी खासगी व शासकीय रुग्णांलये अथवा प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या एचआयव्ही चाचणीच्या गोपनियतेवर धुळे जिल्ह्यात उघड झालेल्या फसवणुकीच्या प्रकाराने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वास्तविक, प्रत्येक रुग्णाच्या आजाराविषयी गोपनियता राखण्याची जाणीव वैद्यकीय व्यवसायाची सनद प्राप्त करताना डॉक्टरांना देण्यात येते. धुळ्यातील घटनेत डॉक्टरांचा संबंध दिसत नसला तरी खासगी वा शासकीय प्रयोगशाळांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांकडून हाताळले जाणारे हे अहवाल गोपनिय राहू शकतात काय, अशी साशंकता निर्माण झाली आहे.
रुग्णाचा एचआयव्ही वा तत्सम गंभीर आजाराच्या अहवालाचा फसवणुकीसाठी कसा वापर होऊ शकतो, ही बाब धुळ्यातील घटनेत प्रकर्षांने पुढे आली. संवेदनशील अहवाल उघड झाल्यास संबंधित व्यक्ती व तिच्या कुटुंबियांचे आयुष्य उध्वस्त होण्याची भीती असते. ‘एचआयव्ही’ चाचणीचा अहवाल गोपनिय रहावा, यासाठी शासन लेखी अद्याप कोणताही नियम नसला तरी अलिखीत नियमांचे कटाक्षाने पालन केले जात असल्याचा दावा केला जातो. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक विद्याशाखा परिषदेमार्फत डॉक्टरांना वैद्यकीय निती-नियमांचे पालन करण्याबाबत शपथ दिली जाते. त्यात प्रत्येक रुग्णाच्या आजाराविषयी गोपनियता बाळगण्याचा अंतर्भाव आहे. डॉक्टर व शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जो नियम लागू आहे, तो त्यांच्या हाताखाली कार्यरत असणाऱ्यांवरही बंधनकारक असतो. तथापि, पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळे वा कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्या नियमांची जाणीव करून न दिल्यामुळे असे प्रकार घडण्याची शक्यता बळावते.
शासकीय रुग्णालयामधील चाचणीत रुग्ण ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ आढळल्यास त्याचा अहवाल इतर नातेवाईकांच्या हाती दिला जात नाही. तो केवळ रुग्णाच्याच हाती दिला जातो, असे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील एचआयव्ही उपचार केंद्राचे प्रमुख डॉ. सुनील ठाकूर यांनी सांगितले. प्रत्येक रुग्णाच्या अहवालाबद्दल गोपनियता पाळली जाते. एखाद्या व्यक्तीला ‘एचआयव्ही’ची लागण झाल्याचे निदान झाल्यावर ही बाब त्याच्या नातेवाईकांना सांगितली जात नाही. संबंधित एचआयव्ही बाधीत व्यक्ती जर पुरूष असेल तर केवळ त्याच्या पत्नीला आणि संबंधित व्यक्ती जर स्त्री असेल तर केवळ तिच्या पतीला सांगण्याचा डॉक्टरांना अधिकार आहे. ही माहिती देण्यामागे संबंधित व्यक्तीवर योग्य पद्धतीने पुढील उपचार व्हावेत, हा एकमेव उद्देश असतो, असे ठाकूर यांनी नमूद केले.
काही वर्षांपूर्वी शिक्षण पूर्ण झाल्यावर वैद्यकीय निती नियमांची जाणीव सर्व शाखांच्या परिषदांमार्फत करून दिली जात होती. तथापि, ही पद्धतच आता बंद झाल्याकडे वैद्य विजय कुलकर्णी यांनी लक्ष वेधले. एखाद्या व्यक्तीला एचआयव्ही झाला आहे, ही बाब डॉक्टर अथवा वैद्य तिसऱ्या व्यक्तीसमोर उघड करू शकत नाही. जे बंधन खुद्द डॉक्टरांवर आहे, ते आपसूक त्यांच्या अखत्यारीत कार्यरत कर्मचाऱ्यांवरही आहे. समाजहिताच्या दृष्टीने वैद्यकीय निती-नियमांचे पालन आवश्यक असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. शरद पगारे यांनी डॉक्टरांकडून रुग्णांच्या अहवालाविषयी पूर्णत: गोपनियता बाळगली जात असल्याचे सांगितले. केवळ एचआयव्ही तपासणीच नव्हे तर एक्स-रे, रक्तदाब, इसीजी, हिमोग्लोबीन तपासणी अशा सर्वच चाचण्यांबाबत डॉक्टर गोपनियतेची खबरदारी घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Question mark on hiv report privacy
First published on: 20-06-2013 at 08:32 IST