जगभरातील प्रामाणिक शहरांच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या मुंबईत मध्य रेल्वेमार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांत नोव्हेंबपर्यंत मध्य रेल्वेवर पकडलेल्या विनातिकीट प्रवाशांची संख्या १३.३१ लाख एवढी प्रचंड आहे. गेल्या वर्षी याच काळात ११ लाख प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडण्यात आले होते. रेल्वेने या फुकटय़ा प्रवाशांकडून आतापर्यंत ६२.७० कोटी रुपयांचा दंडही वसूल केला आहे.
एप्रिल ते नोव्हेंबर २०१३ या आठ महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेने तब्बल १३.३१ लाख प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडले. त्यांच्याकडून ६२.७० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यापैकी सर्वात जास्त रक्कम नोव्हेंबर महिन्यातच वसूल केली गेली. नोव्हेंबर महिन्यात १०.३८ कोटी रुपये फुकटय़ा प्रवाशांकडून वसूल करण्यात आला होता. गेल्या वर्षी याच कालावधीत ११.९७ लाख प्रवाशांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून वसूल केलेल्या दंडाची रक्कम ५३.३७ कोटी एवढी होती. त्या तुलनेत यंदा विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. दंडवसुलीच्या रकमेत तर १७.४६ टक्के एवढी घसघशीत वाढ झाली आहे.
वास्तविक दंडाची रक्कम तिकिटाच्या रकमेपेक्षा जास्त असल्याने विनातिकीट प्रवाशाला पकडल्यास रेल्वेचाच फायदा होतो. फुकट प्रवास करणाऱ्यांविरोधात कारवाई अधिक कडक केली जाणार असल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.