येथील लक्षतीर्थ वसाहतीजवळ एका बांधकामाच्या ठिकाणी पंचवीस वर्षीय परप्रांतीय नराधमाने १४ महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार केला. राजेसिंग बबलेसिंग या आरोपीला नागरिकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकाराचे शहरात तीव्र पडसाद उमटले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली महाव्दार रोडवरील परप्रांतीयांची दुकाने बंद करून त्यांना पिटाळून लावले. परप्रांतीय हटाओ, कोल्हापूर बचाओ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.    
फुलेवाडी रोड मार्गावर कसबेकर हॉल परिसरात एक बांधकाम सुरू आहे. तेथे राजेसिंग हा सेंट्रीगचे काम करतो. या बांधकामावरील कामगाराची १४ महिन्याची मुलगी बांधकामाच्या ठिकाणी खेळत होती. तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवून राजेसिंग याने आडबाजूला नेले. तेथे तिच्यावर त्याने बलात्कार केला.    
चौदा महिन्याच्या बालिकेवर बलात्कार झाल्याची माहिती समजताच परिसरातील नागरिक तेथे जमले. जमावाने राजेसिंगला पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला लक्ष्मीपुरी पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली त्याला अटक केली आहे.या घटनेमुळे शहरात सार्वत्रिक संताप व्यक्त केला गेला. शिवसेनेने या आंदोलनाला परप्रांतियांची जोड दिली. परप्रांतियांमुळे गुन्हेगारी घटना घडत असल्याचा आरोप करीत शिवसैनिकांनी महालक्ष्मी मंदिराजवळील महाव्दार रोडवर असणारी परप्रांतियांची विविध प्रकाराची दुकाने बंद पाडली. परप्रांतीय हटाओ, कोल्हापूर बचाओ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परप्रांतीय विक्रेत्यांना तेथून पिटाळून लावले. या आंदोलनामुळे या परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.