रांगोळी (ता.हातकणंगले) येथे अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर संतप्त जमावाने संशयित आरोपी मोहसीन मुल्लाणी याला बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या घराची व दुचाकीची मोडतोड करण्यात आली. जखमी झालेल्या मुल्लाणीवर कोल्हापुरातील खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने रांगोळी गावात पोहोचले. त्यांनी शांतता समितीची बैठक घेतल्यानंतर तणावाचे वातावरण निवळले.     
मोहसीन मुबारक मुल्लाणी हा रांगोळी येथील माळ भागावर राहतो. तो हुपरी येथे चांदी कामगार म्हणून काम करतो. दोन दिवसापूर्वी त्याने चौदा वर्षीय गतिमंद मुलीवर घरामध्ये बलात्कार केला होता. संबंधित मुलीने पोटात दुखत असल्याचे कुटुंबीयांना सांगितल्यावर तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. या प्रकारामुळे चिडलेल्या मुलीच्या चुलत्याने संशयित आरोपी मोहसीन याला गावाबाहेर नेऊन बेदम मारहाण केली. तर या मारहाणीची तक्रार नोंदविण्यासाठी मोहसीन हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गेला होता.    
दरम्यान बलात्काराची घटना गावातील लोकांना समजली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जमावाने मोहसीनच्या घरावर हल्ला चढविला. घरारील साहित्याची मोठय़ा प्रमाणावर नासधूस करण्यात आली. त्याच्या दुचाकीची मोडतोड केली. मुल्लाणी याला गाठून जमावाने बेदम चोप दिला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक प्रकाश देशमुख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलिसांची जादा कुमक रांगोळीत पोहोचली. त्यांनी गोंधळ घालणाऱ्या जमावाला काबूत आणले. जखमी झालेल्या मोहसीनला कोल्हापुरातील आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकाश देशमुख यांनी गावातील शांतता समितीची बैठक घेतली. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तानाजी सादळे, ग्रामस्थ बैठकीस उपस्थित होते. देशमुख यांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर रांगोळी गावातील सकाळपासून सुरू असलेला तणाव सायंकाळी निवळला. पीडित मुलीवर इचलकरंजीतील आयजीएम इस्पितळात उपचार सुरू आहेत.