राष्ट्रवादी काँग्रेसचा शनिवारी संतनगरी शेगावात होणारा अमरावती विभागीय कार्यकर्ता मेळावा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगीत तालीम ठरणार आहे. पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्य़ात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढविण्यासाठी हा मेळावा निर्णायक ठरणार आहे. काँग्रेससोबत आघाडी करून बुलढाणा, वाशीम व अमरावती हे लोकसभा मतदार संघ पदरात पाडून घ्यायचे व या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत पक्षाचे खासदार निवडून आणायचे, याची राजकीय व्युहनीती या मेळाव्यात ठरणार आहे.
या मेळाव्याला पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.तसेच  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री मनोहर नाईक, माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, सुभाष ठाकरे, सुबोध सावजी आदी दिग्गज उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याला विभागातून वीस ते पंचवीस हजार निवडक कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे. शरद पवार पक्षासाठी महाराष्ट्रात सुरक्षित लोकसभा मतदार संघ व निवडून येणारे प्राविण्य श्रेणीतील उमेदवारांची चाचपणी करीत आहेत. ही जबाबदारी त्यांनी अजित पवार, पक्षाध्यक्ष भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांच्याकडे दिली आहे. बुधवारी अजितदादा पवार यांनी जळगाव जिल्ह्य़ाच्या धावता दौऱ्यावेळी    चाचपणी केली. यासंदर्भात त्यांनी खासदार भंवरलाल जैन, गुलाबराव देवकर, संजय सावकारे व अन्य नेत्यांशी सखोल चर्चाही केली.
शेगावच्या विभागीय मेळाव्यात त्यांचे बुलढाणा, अमरावती, वाशिम-यवतमाळ या लोकसभा मतदार संघाच्या चाचपणीकडे प्रामुख्याने लक्ष राहणार आहे. अमरावती मतदार संघ मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्ष गवई गटाला दिला होता. आता पक्षाची स्वत:च्या तिकिटावर व चिन्हावर तेथे लढण्याची इच्छा आहे. येथील संभाव्य इलेक्टीव्ह मेरिट उमेदवाराचा युध्द पातळीवर शोध सुरू आहे. वाशिम-यवतमाळ मतदार संघात मंत्री मनोहर नाईक यांनी लढावे व निवडून यावे, अशी पक्ष नेतृत्वाची प्रबळ इच्छा आहे. त्यासाठी पक्षाने नाईक यांना जय्यत तयारी करण्याचे सांगितले आहे. त्यासाठीच त्यांना वाशिम-यवतमाळात अधिक वेळ मिळावा म्हणून तेथील पक्ष प्रबळ करण्याची जबाबदारी दिली आहे. बुलढाणा लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादीचा प्रबळ हक्क आहे. येथे गेल्या निवडणुकीत अवघ्या २६ हजार मतांनी पक्षाचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा पराभव झाला होता. आता डॉ.राजेंद्र शिंगणे, कृष्णराव इंगळे, सुबोध सावजी व नव्याने पक्षात आलेल्या रेखाताई खेडेकर यांचा उमेदवारीसाठी दावा आहे. त्यात शिंगणेंना रिपीट करायचे की, नव्याने येणाऱ्या व कोरी पाटी असलेल्या रेखाताई खेडेकरांना तिकिट द्यायचे, याची युध्द पातळीवर चाचपणी केली जात आहे.
भाकित तंतोतंत खरे
लोकसत्ताने  २ जून व ३० जूनच्या अंकात रेखा खेडेकर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतील आणि त्याच बुलढाणा लोकसभा मतदार संघाच्या संभाव्य उमेदवार असतील, असे भाकित वर्तविले होते. ते आता खरे ठरत आहे.  उद्या, शनिवारच्या पक्षाच्या विभागीय मेळाव्यात त्या राष्ट्रवादीत प्रवेश घेत आहेत. शरद पवार यांनी त्यांना लोकसभा तिकिटाचा शब्द दिला आहे. त्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्रातील मराठा सेवा संघ, शिवधर्मप्रणीत सर्व संघटना लोकसभा व विधानसभेत राष्ट्रवादीला साथ देतील.  महाराष्ट्रातील संघविरोधी व मुंडेविरोधी भाजपा असंतुष्ट गट राष्ट्रवादीकडे वळविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न राहणार आहे.