प्रलंबित मागण्यांकडे केंद्र व राज्य शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ देशभरातील स्वस्त धान्य दुकानदार ११ डिसेंबर रोजी बंद पाळणार असून त्यात धुळ्याचे दुकानदारही सहभागी होणार असल्याची माहिती ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डिलर्स फेडरेशनचे राष्ट्रीय सदस्य आणि प्रांत उपाध्यक्ष महेश घुगे यांनी येथे स्वस्त धान्य दुकानदारांच्या सभेत दिली.
सक्षम यंत्रणा न उभारता शासन सदोष योजना राबविण्याची घाई करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गठीत करण्यात आलेल्या न्यायमूर्ती वधवा समितीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्याचा विरोध करण्यासाठी आणि इतर प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
आंदोलनाचा एक भाग म्हणून ११ डिसेंबरला सकाळी ११ वाजता गांधी पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वस्त धान्य दुकानदारांचा मोर्चा संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष महेश घुगे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे.
या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे सचिव संतोष जैन व पदाधिकारी सुभाष कोटेचा, मुरलीधर नागोमती, प्रमोद बडगुजर, सुनील भावसार आदींनी केले आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ration shop holder on strike in dhule
First published on: 01-12-2012 at 05:29 IST