विद्यार्थ्यांना मराठी वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी वाचलेल्या पुस्तकाच्या अनुषंगाने विचार करण्याची सवय लागावी या उद्देशाने विलेपार्ले येथील ‘पार्ले पंचम्’ या संस्थेने ‘वाचू आनंदे’ हा वैशिष्टय़पूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. येत्या शनिवारी, १५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता विलेपार्ले येथील माधवराव भागवत हायस्कूलमध्ये मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होत आहे.
सातवी ते नववीमधील विद्यार्थी/विद्यार्थिनींनी मराठी साहित्यातील आत्मचरित्रे, प्रवासवर्णने, नाटक, काव्य यापैकी एका प्रकारचे पुस्तक वाचून त्यावर रसग्रहणात्मक निबंध लिहावा. त्यानंतर या सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या निबंधाचे वाचन करून त्यावर वाद-चर्चा करावी, असे या उपक्रमाचे ढोबळ स्वरूप आहे. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सखोल वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
शनिवारी ‘वाचू आनंदे’ उपक्रमाच्या उद्घाटनानंतर सर्व सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनी मराठी भाषेच्या संवर्धनाकरिता प्रतिज्ञा घेणार आहेत. उत्कृष्ट रसग्रहणात्मक निबंधांचे वाचन मराठी राजाभाषा दिन कार्यक्रमात केले जाणार आहे. पहिल्या तीन क्रमांकांना पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. शनिवारच्या कार्यक्रमात पाल्र्यामधील इंग्रजी शाळेतील विद्यार्थीही सहभागी झाले असल्याचे ‘पार्ले पंचम’चे अध्यक्ष श्रीधर खानोलकर यांनी सांगितले. रत्नागिरी येथील ‘रत्नागिरी एज्युकेशन ट्रस्ट’च्या उपक्रमातून ‘वाचू आनंदे’ची प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Read with happyness
First published on: 14-12-2012 at 12:39 IST