राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुला-मुलीच्या विवाहानंतर चर्चेत आलेल्या कराडातील शहा कन्स्ट्रक्शनची आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी चौकशी केली. पंकज हॉटेलमध्ये असलेले शहा कन्स्ट्रक्शनचे कार्यालय व हॉटेलच्या कागदपत्रांचीही यावेळी तपासणी करण्यात आली. यावर संबंधितांनी ही नियमित तपासणी असल्याचे म्हटले आहे.
चिपळूणमध्ये राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुलाचा व मुलीचा विवाह शाही समारंभ नुकताच पार पडला. त्यात झालेल्या खर्चाबाबत मंत्री जाधव व शहांसह शहा कन्स्ट्रक्शनवर टीका झाली. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना करण्यात आलेला लग्नातील खर्च वादग्रस्त बनला. या प्रकरणामुळे कराडचे शहा कन्स्ट्रक्शन जोरदार चर्चेत आले. दरम्यान, सोमवारी आयकर विभागाचे अधिकारी अचानकपणे शहा कन्स्ट्रक्शनशी संबंधित असलेल्या पंकज हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यांनी हॉटेलमध्ये कागदपत्रांची तपासणी केली. दुपारी दीडच्या सुमारास अधिकाऱ्यांच्या एका पथकाने हॉटेलमध्ये येऊन त्यांच्याकडून रात्री ७ वाजेपर्यंत चौकशी केली. या संदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी हॉटेलव्यवस्थापनाशी संपर्क साधला असता आयकर विभागाची ही नियमित तपासणी असल्याचे सांगण्यात आले, तर आयकर विभागाचे अधिकारी डॉ. ठाकूर यांनी ही नियमित तपासणी असून, ठराविक कालावधीत ती करावीच लागत असल्याचे म्हटले आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Regular enquiry of shaha construction by income tax department
First published on: 19-02-2013 at 10:13 IST