निवडणुकीच्या काही महिने आधीपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतून बोलेरो, आर्माडा वा इनोव्हा या वाहनांच्या चोरीच्या संख्येत अचानक वाढ होत असल्याचा आतापर्यंतचा अनुभव होता. परंतु यंदा मात्र वाहनचोरीला वेसण बसल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीची हवा तापू लागल्यापासून ठाणे व नवी मुंबईतूनही अशा पद्धतीची वाहने चोरीला गेलेली नाहीत, असेही या सूत्रांनी सांगितले.
मुंबई, ठाणे व नवी मुंबईतून आठवडय़ात चार ते पाच वाहने हमखास चोरी होतात. निवडणुकीच्या काळात विशिष्ट वाहनांच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढते. ही वाहने उत्तर प्रदेशात वा बिहारमध्ये चोरून नेऊन तेथे निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरली जातात. त्यामुळे यंदाही अशा पद्धतीने वाहने चोऱ्या होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु यंदा पहिल्यांदाच विशिष्ट पद्धतीची वाहने चोरी होण्याचे प्रमाण नगण्य असल्याचे सूत्रांनी सांगितले. निवडणुकीची हवा तापल्याने आता यापुढे निवडणुकीसाठी वाहनांची चोरी होण्याची शक्यता नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.