इचलकरंजीतील प्रसिद्ध सूत व्यापारी प्रवीण अग्रवाल यांच्या बंगल्यावर शुक्रवारी रात्री चोरटय़ांचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला. चोरटय़ांनी वॉचमनच्या गळ्याला चाकू लावून धमकाविले होते. अग्रवाल यांचे वडील जागे होऊन त्यांनी आरडाओरडा केल्याने चोरटे पसार झाले.     
संत नामदेव भवनजवळ सूत व्यापारी अग्रवाल यांचा बंगला आहे. या बंगल्यात त्यांचे सर्व कुटुंबीय राहतात. तर खालील बाजूस कार्यालय आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास काही चोरटे बंगल्यामध्ये घुसले. त्यांनी पहारेक ऱ्यास चाकूचा धाक दाखवत आत घुसण्याचा प्रयत्न केला. चोरटय़ांनी धमकाविल्याने वॉचमन जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकून अग्रवाल यांच्या वडिलांनी वरच्या मजल्यावरून डोकावून पाहिले असता त्यांना चोरटे बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे जाणवले. त्यांनी सावध होऊन बंगल्यात झोपलेल्या प्रवीण याला जोरजोराने हाका मारण्यास सुरुवात केली. शेजाऱ्यांनाही हाका मारून जागविण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आरडाओरडा पाहून चोरटे पाच मिनिटांच्या अवधीतच तेथून गायब झाले. सुमारे सहा ते सात चोरटे असावेत. ते बंगल्याजवळून काही अंतरावर गाडी लावून आले असावेत, अशी शक्यता प्रवीण अग्रवाल यांनी व्यक्त केली. अग्रवाल यांच्या बंगल्यावर दरोडय़ाच्या प्रयत्नामुळे शनिवारी दिवसभर सूत बाजारामध्ये चर्चा रंगली होती.