सुमारे सोळा लाख रुपये किमतीची चंदनाच्या लाकडांची तस्करी आज घारगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. रक्तचंदनाच्या लाकडांसह टेंपो पोलिसांनी जप्त केला असून दोघा तस्करांच्या मुसक्या आवळण्यात यश आले, मात्र तिघे पसार झाले.
गुलाब होनबा जाधव (राहणार सुरवड, ता. इंदापूर) व भीमराव गायकवाड (शिरूर) अशी अटक केलेल्यांची तर अजित यशवंत वाळुंज (अण्णापूर, ता. शिरूर), शिवाजी बाबू मोरे (रामिलग, ता. शिरूर ) व तुकाराम रामा माने (रवंगडे, ता. जत ) अशी पळालेल्या आरोपींची नावे आहेत. चंदनाची लाकडे भरलेला टेंपो आळेफाटामार्गे नाशिककडे जाणार असल्याची खबर पोलीस निरीक्षक वसंत तांबे यांना मिळाली होती. त्यानुसार घारगाव पोलिसांनी पुणे-नाशिक मार्गावर खंडोबाचा माळ येथे मध्यरात्री सापळा लावला. संशय आलेली वाहने तपासण्यात येत होती. पहाटे सहाच्या सुमारास पोलिसांनी एमएच ४२ पी-५२० क्रमांकाच्या टेंपोस अडवले. त्यातील हालचाली संशयास्पद वाटल्याने तपासणी करत असताना मागे बसलेले तिघे उडय़ा टाकून पसार झाले. केबिनमधील दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. चंदनाच्या लाकडांनी भरलेला टेंपो पोलीस ठाण्यात आणण्यात आला. त्यामध्ये सुमारे १ हजार ५०० किलो चंदनाची लाकडे आढळून आली. बाजारभावानुसार त्याची किंमत १५ लाख ९५ हजार होते. हे चंदन कोठून आणले व कोठे चालले होते याबाबतची माहिती मात्र मिळू शकली नाही.