केंद्र शासन नियुक्त सनदी अधिकाऱ्यांचे पथक २५ ते २८ मे या कालावधीत जिल्ह्य़ातील निफाड, दिंडोरी, येवला व नाशिक या तालुक्यांतील शाळांना शिक्षण हक्क कायद्याचे निकष पडताळणीसाठी भेट देणार आहेत. या कालावधीत माध्यमिक शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचे माध्यमिक व प्राथमिक शिक्षण अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले असल्याची माहिती नाशिक जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर विकास आघाडीने दिली आहे.
या पथकाच्या भेटीदरम्यान शिक्षकांनी उपस्थित राहण्यास गटशिक्षण अधिकारी आणि काही माध्यमिकच्या मुख्याध्यापकांनी एसएमएस तसेच दूरध्वनीद्वारे शिक्षकांना कळविले होते. दीर्घ सुटीच्या कालावधीत बहुतांश शिक्षकांनी गावाला जाण्याचे नियोजन केलेले असते. सुटय़ांमध्ये प्रत्येक शिक्षक त्यांच्या व्यक्तिगत कामात गुंतलेला असताना अचानक आलेल्या संदेशामुळे त्यांची एकच धावपळ उडाली. काही शिक्षकांनी यासंदर्भात जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर विकास आघाडीकडे संपर्क साधला.
संघटनेने यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून त्यांना परिस्थितीची माहिती दिली. प्राथमिकचे शिक्षण अधिकारी रहिम मोगल यांच्याशीही संपर्क साधून चर्चा केली. त्या वेळी त्यांनी आम्ही कोणत्याही शिक्षकास उपस्थित राहण्याचे आदेश दिले नसल्याची माहिती दिली.
सुटीच्या कालावधीत मुख्याध्यापक आणि कार्यालयीन कर्मचारी शाळेत उपस्थित राहात असतातच. त्यामुळे माध्यमिक शाळेतील इतर शिक्षकांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हे लक्षात घेता २५ ते २८ मे या कालावधीत माध्यमिक शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहू नये, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे, समन्वयक पुरुषोत्तम रकिबे, वासुदेव बधान आदींनी केले आहे.