तेजस, निशांत, दक्ष अशी हवाई दलातील विमानांची प्रतिरूपे.. सन्य दलातील विविध हत्यारे याचबरोबर हवामानाचा अंदाज कसा लावला जातो याचे प्रात्यक्षिक अशा विविध विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनांची जत्रा सध्या मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलालगत असलेल्या एमएमएआरडीए मैदानात भरली आहे.
इंडियन सायन्स काँग्रेसच्या निमित्ताने देशातील विविध वैज्ञानिक संस्थांनी आपल्या अभ्यासाचे याचबरोबर विविध प्रयोगांचे प्रदर्शन भरविले आहे. यामध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थांचाही (डीआरडीओ) समावेश आहे. संरक्षण खात्याबद्दल सर्वानाच आकर्षण असते. तेथील जवानांतर्फे करता येणाऱ्या करामतींबाबतही अनेकांना उत्सुकता असते. ही सर्व उत्सुकता या प्रदर्शनात शमणार आहे. भारतीय बनावटीच्या ‘तेजस’ या लढाऊ विमानाची सविस्तर माहितीही या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहे. याशिवाय केंद्र शासनाच्या पृथ्वी विज्ञान विभागतर्फेही भूगर्भाची माहिती देणारे अभ्यासपूर्ण प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये भूगर्भातील अनेक हालचालींची माहिती होतेच. याचबरोबर तेथे एका विशिष्ट स्पध्रेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पध्रेत पहिली ते चौथी, पाचवी ते नववी, दहावी ते बारावी, पदवीधर, पदव्युत्तर पदवी अशा विविध स्तरावर ऑनलाइन घेण्यात येते. यात ५० टक्के यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांला विशेष प्रमाणपत्रही दिले जाते. या प्रदर्शनाच्या प्रांगणात ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेचा ऊहापोह करणारे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. नेहरू विज्ञान केंद्रातर्फे भरविण्यात आलेल्या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांची खच्चून गर्दी दिसून येते. येथे, वैज्ञानिक खेळांच्या माध्यमातून शाळेत शिकविल्या जाणाऱ्या विविध वैज्ञानिक संकल्पना शिकविल्या जात आहेत. याशिवाय या ठिकाणी जमिनीच्या विविध स्तरांचा अभ्यास थ्रीडीचा वापर करून दाखविण्यात आला आहे. यासाठी एका मोठय़ा ट्रेमध्ये पांढरी वाळू ठेवण्यात आली आहे. या वाळूचा जर आपण डोंगर केला तर विविध स्तरांवर कोणकोणत्या गोष्टी आढळतात याचे वेगवेगळे रंग दिसून येतात. या रंगांचा वेगळा तक्ताही येथे लावण्यात आला आहे. यामुळे कोणत्या स्तरावर काय आढळते याची माहिती आपल्याला मिळू शकते. अशीच माहिती जर आपण या मातीत खड्डा खणला असताही विविध रंगांद्वारे मिळते. याशिवाय विविध विद्यापीठांच्या विज्ञान विभागांच्या स्टॉल्समध्येही विज्ञान प्रयोगांची माहिती मिळू शकते.
‘नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’च्या प्रदर्शनातही अत्याधुनिक शेतीपयोगी उपकरणांची माहिती करून दिली जात आहे. शेतीसाठी हवामानाची अनुकूलता तपासण्यासाठी आपल्या शेताजवळ कशाप्रकारे छोटेखानी रडार लावून हवामान अंदाज घेऊ शकतो याची माहिती एका मोठय़ा शेताचा आराखडा तयार करून दाखविण्यात आले आहे. याचबरोबर ‘एनपीसीआयएल’तर्फेही अणू विज्ञानाबाबत जागरूकता निर्माण करणारे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन ७ तारखेपर्यंत सर्वाना पाहता येईल.
जालना ते इंडियन सायन्स काँग्रेस
इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सहभागी झालेले शेकडो तरुण विविध वैज्ञानिक प्रयोग, विमानांच्या प्रतिकृती आदींच्या जवळ आपले सेल्फी काढण्यात रमलेले असतानाच डीआरडीओच्या प्रदर्शनात फाटके कपडे, एका हातात कापडी पिशवी घेऊन ‘लक्ष्य’, ‘तेजस’ अशा विविध लढाऊ विमाने, रॉकेट लाँचर्स आदींची माहिती घेण्यात एक शेतकरी गढला होता. विज्ञानाची आवड असल्यामुळे हे प्रदर्शन पाहण्यासाठी बबनराव खराटे हे थेट जालना जिल्हय़ातील एका खेडय़ातून मुंबईत आले होते. तुम्ही मुंबईत काही कामानिमित्त आलात आणि येथे आलात का, असा प्रश्न विचारला असता खराटे म्हणाले की, नाही हे प्रदर्शन पाहण्यासाठीच मी मुंबईला आलो आहे. आपल्यालाही जगाची माहिती व्हावी या उद्देशाने मी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनांना नेहमीच भेट देत असतो. राष्ट्रीय पातळीवर काय सुरू आहे हे पाहण्यासाठी मी या प्रदर्शनाला आलो आहे. मात्र काही भागात माझ्या फाटक्या कपडय़ांमुळे मला सोडत नसून माझ्याकडे पास मागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. डीआरडीओच्या प्रदर्शनात मात्र कोणतीही अडचण न येता प्रवेश मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता.
जिवाची मुंबई
इंडियन सायन्स काँग्रेसच्या निमित्ताने देशभरातून विद्यार्थी, शिक्षक मुंबईत आले आहेत. यातील अनेकजण प्रथमच मुंबईत आल्यामुळे ते जिवाची मुंबई करताना दिसून येत आहे. अनेक विद्यार्थी त्यांची राहण्याची सोय केलेल्या ठिकाणाहून सकाळी ८.३० पर्यंत विद्यापीठात पोहोचतात. तेथे नाश्ता करून चौघेजण मिळून एक टॅक्सी ठरवतात आणि मुंबईची सफर करायला निघतात. सकाळी पश्चिम उपनगरातील जुहू चौपाटी, इस्कॉन मंदिर आदी स्थळे फिरून दुपारी १.३० वाजता पुन्हा जेवणासाठी विद्यापीठात पोहोचतात. यानंतर २.३० पर्यंत पुन्हा पुढच्या प्रवासाला निघतात आणि रात्री जेवणासाठी पुन्हा विद्यापीठात येऊन विद्यापीठाच्या गाडीने राहण्याची सोय केलेल्या ठिकाणी ते पोहोचतात.

pune ranks among the forgetful passengers
विसरभोळ्या प्रवाशांमध्ये पुणेकर देशात पाचव्या स्थानी! जाणून घ्या कोणत्या वस्तू विसरतात…
china sinking
न्यूयॉर्क आणि टोकियोनंतर चीनमधील शहरेही जलमय; जगातील ‘ही’ शहरे पाण्याखाली जाण्याचे कारण काय?
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
paris 2024 olympics olympic torch lit in greece
खराब हवामानातही ग्रीसमध्ये ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित!