आयुष्याच्या पूर्वार्धात विविध क्षेत्रात कार्यरत राहिल्यानंतर सेवानिवृत्तीनंतरचा काळ केवळ विश्रांतीत व्यतीत न करता विधायक उपक्रमात सहभागी होऊन ठाण्यातील लोकमान्य टिळक ज्येष्ठ नागरिक संघाने समाजकार्याचा नवा आदर्श घालून दिला आहे. आपल्या आजूबाजूला असणारा बेशिस्तपणा, स्वच्छता, प्रदूषण आणि जनजागृती या विषयांवर काम करण्याचा निर्णय घेत या ज्येष्ठ नागरिक संघाने घेतला असून आयुष्यातील उत्तरायणात सामाजिक कार्याचा मार्ग अवलंबला आहे.
ठाण्यातील ज्ञानोदय विद्यालयाजवळ सावरकर नगर येथील नाना-नानी पार्कमध्ये दीडेशहून अधिक ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊ लागले होते. समाजातील परिस्थितीवर केल्या जाणाऱ्या टिपण्या, सभोवतालच्या परिस्थितीबद्दलची नाराजी, एकमेकांची सुख-दु:ख यांच्याही चर्चा व्हायच्या. मात्र त्यापलीकडे जाऊन समाजातील एक जबाबदार घटक म्हणून परिस्थिती बदलण्याची आपलीही जबाबदारी आहे, हे ओळखून याच नागरिकांमधील काही मंडळींनी पुढाकार घेत सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली. जागतिक समस्या बनलेल्या पर्यावरणासंदर्भात त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. जनजागृती रॅली, पथनाटय़ आणि घरोघरी जाऊन प्रचार अशा पद्धतीने त्यांचे काम सुरू होते. गणेशोत्सवाच्या काळात मूर्ती विसर्जनासोबत प्लास्टिकच्या पिशव्यांमधून मोठय़ा प्रमाणात निर्माल्य तलावात फेकण्यात येते. त्यावर उपाय म्हणून त्यांनी कागदी पिशव्या विनामूल्य देण्यास सुरुवात केली.
लोकमान्य नगर आगारामधील बेशिस्तपणा आणि अस्वच्छतेबद्दलच्या अनेक तक्रारी होत्या. बसमध्ये चढताना प्रवासी झुंडशाहीने वागत होते. अनेकदा महिलांना याचा त्रास होत असे. संघाचे सदस्य आगारामध्ये जाऊन नागरिकांना रांगेत उभे राहण्यासाठी मार्गदर्शन करू लागले.
सुरुवातीला या बदलाविषयी प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
मात्र शिस्तीमुळे आपलाच फायदा होतोय हे लक्षात आल्यावर ज्येष्ठ नागरिकांच्या उपक्रमाचे प्रवाशांनीही कौतुक केले. लोकमान्य नगर येथील एस.टी. आगारातून मीरा रोड, खारीगाव, वृंदावन, मुलुंड तसेच ठाणे स्थानकात बस जातात. दररोज दहा हजारांहून अधिक प्रवासी येथून प्रवास करतात.
त्यामुळे येथे अधिक सुविधा मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती संघाचे अध्यक्ष विष्णू फडणीस आणि सचिव आसावरी फडणीस यांनी दिली.