तालुक्याच्या सर्व धरणांमध्ये समाधानकारक पाणी असतानाही ग्रामीण भाग मात्र टंचाईच्या फेऱ्यात अडकला असून या समस्येमुळे आता कायदा व सुव्यवस्थेला आव्हान मिळण्याचे प्रकार घडू लागले आहे. अलीकडेच महाराष्ट्र दिनानिमित्त धामणी येथे झालेल्या ग्रामसभेतही त्याचे प्रत्यंतर पाहावयास मिळाले. ग्रामसभेत टंचाईचा प्रश्न मांडणाऱ्या महिलेला तिच्या प्रश्नाचे उत्तर न देता उलट उपसरपंच आणि त्याच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आली.
ग्रामसेवकांचे दुर्लक्ष आणि पंचायत समिती प्रशासनाचे उदासीन धोरण यामुळे धरणालगतच्या गावांना कृत्रिम पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. सर्वाधिक धरणांचा आणि प्रचंड पर्जन्याचा तालुका अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्याच्या काही गावात टंचाई जाणवू लागली आहे. या गावांनी पंचायत समितीकडे टंचाईचे प्रस्ताव देवूनही शासनाकडून अद्याप त्याची कोणतीही दखल घेण्यात न आल्याने टंचाईचे स्वरूप अधिक तीव्र होऊ लागले आहे. सर्वाधिक टंचाई तालुक्यातील चिंचले खैरे, वासाळी, आंबेवाडी, खडकेद या गावांसह दारणा नदीलगतच्या गावांना जाणवत आहे. धामणी गावही टंचाईच्या झळांमध्ये सापडल्याने गावातील महिला पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी हैराण झाल्या आहेत. टंचाईवर उपाययोजना शोधण्यासाठी महिलांनी पंचायत समिती, ग्रामपंचायतीकडे सातत्याने मागणी करूनही त्याची दखल घेण्यात न आल्याने महिला त्रस्त झाल्या आहेत.
महाराष्ट्र दिनाच्या पाश्र्वभूमीवर धामणी येथे आयोजित ग्रामसभेत महिलांनी टंचाईचा विषय मांडला. टंचाई निवारणार्थ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामसेवकांनी कोणत्या उपाययोजना केल्या, असा प्रश्न उपस्थित करत महिलांनी त्यांना धारेवर धरले. सुमनबाई भोसले यांनी गावात राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेविषयी महिती मागितली असता उपसरपंच भाऊसाहेब भोसले यांच्यासह उत्तम भोसले, गौतम भोसले, सोपान भोसले आदींनी या महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली.यासंदर्भात या महिलेने घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी उपसरपंचासह तिघा समर्थकांविरूध्द अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. ज्यांचे प्रस्ताव आले आहेत, अशा टंचाईग्रस्त गावांसाठी त्वरीत टँकरव्दारे पाणी पुरवटय़ाची व्यवस्था करण्यात न आल्यास अशा प्रकारांमध्ये वाढ होत जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा घटनांमुळे ग्रामीण भागातील शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधितांनी त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे राज्य शासनातर्फे याआधीच ज्यांचे प्रस्ताव येतील त्या गावांमध्ये त्वरीत टँकर सुरू करण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे. असे असतानाही टंचाईचा प्रस्ताव देणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील गावांमध्ये अद्याप टँकरची व्यवस्था करण्यात आली नस्लायबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.