उपराजधानीत मुलीवरील अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढत असताना आरोपींचा शोध घेतला जात नाही. राज्य सरकार त्याबाबत फारसे गंभीर नाही. अत्याचार करणाऱ्या नराधमांना २४ तासात अटक न झाल्यास शिवसेना महिला आघाडीतर्फे राज्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
गेल्या २४ तासात राज्याच्या उपराजधानीत चार मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. शांतीनगर परिसरातील नामांकित शाळेच्या आवारात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. नीलम गोऱ्हे यांनी नागपुरात येऊन मेयो रुग्णालयात जाऊन त्या बालिकेची भेट घेतली. यावेळी डॉक्टर आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली. भंडारामध्ये तीन मुलींची हत्या झाल्यानंतर नागपुरात मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून पोलिसांचा नराधमांवर काही वचक राहिलेला नाही. राज्या सरकार या संदर्भात फारसे गंभीर नसल्यामुळे अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर आरोपी सापडत नाही. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात देशात किती कायदे करण्यात आले तरी त्या कायद्याची अंमलबजावणी होईल याची शाश्वती नाही. उपराजधानीत दक्षता समित्या नाहीत त्यामुळे पोलीस विभागावर नियंत्रण राहिले नाही असेही गोऱ्हे म्हणाले. महिलांवरील अत्याचाराच्या घटनामधील नराधमांना २४ तासात अटक करण्यात आली नाही तर राज्यातील विविध भागात शिवसेना महिला आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. गोऱ्हे यांनी दिला. दरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी शाळेत अत्याचार करणाऱ्या नराधमाला २४ तासात अटक करण्यात येईल असे आश्वासन जोशी यांनी दिले. नागपुर शहरात दक्षता समिती नसल्याचे गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यावर येत्या १५ दिवसात समित्यांची स्थापना करण्याचे आश्वासन पाठक यांनी दिले. यावेळी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजेंद्र सिंह, सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना उपस्थित होते.
वादग्रस्त पत्रक
२७ फेब्रुवारीला राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने एक प्रसिद्ध पत्रक काढले. त्यात भंडारा जिल्ह्य़ातील घडलेल्या तीन बहिणीच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या अध्यक्षपदी निर्मला सावंत प्रभावळकर यांची निवड करण्यात आल्याचे म्हटले आहे. याकडे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजेंद्रसिंह यांचे लक्ष वेधले. या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर त्यांचा खून करण्यात आला आहे. असे असतानाही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रसिद्धी पत्रात त्या मुलींनी आत्महत्या केल्याचे प्रकाशित करणे ही बाब गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन राजेंद्रसिंह यांनी शिष्टमंडळाला दिले.