ठाणे : खारेगाव भागात राहणाऱ्या मुक्ता भानुशाली (६०) यांच्या गळ्यातील तीस हजार रुपयांची सोनसाखळी चोरटय़ांनी खेचून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. खारेगाव नाका येथून चालत असताना पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली आणि पोबारा केला. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे :  खोपट येथील नारळीपाडा परिसरात राहणारे महेश दिवे (२२) आणि खिल्लत पिल्ले या दोघांच्या खिशातून चोरटय़ाने एक लाख तीस हजारांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी घडली. ठाणे स्थानकाजवळील शिवाजी पथ येथून महेश दिवे पायी जात होते. त्या वेळी त्यांच्याकडील एक लाख रुपयांची पिशवी चोरटय़ाने चोरली. त्याच वेळी खिल्लत पिल्ले यांच्या खिशातील ३० हजार रुपयांची रोकडही चोरली. या दोन्ही घटनांप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण :  खडकपाडा परिसरात राहणाऱ्या नीलिमा चव्हाण (२८) या मंगळवारी दुपारी बेतूरकपाडा रोड येथून जात असताना पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ाने त्यांच्या गळ्यातील एक लाख दहा हजारांचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली :  येथील शिवगंगा विहार सोसायटीत सुजाता रांजणे राहत असून मंगळवारी त्या काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत चोरटय़ाने टाळा तोडून त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रकम असा एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर :  दहिसर येथील बालाजीनगरमध्ये करिअप्पा हरिजन (४०) हे  मंगळवारी काही कामानिमित्त उल्हासनगर परिसरात गेले होते. एका हातगाडीवर पाणीपुरी खाण्यासाठी थांबले असताना चोरटय़ांनी त्यांच्याकडील दोन लाख ४० हजार रुपयांची बॅग चोरून नेली. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे : पातलीपाडा भागातील ऋतूपार्कमध्ये राहत असलेल्या रमेश काळे यांच्या मित्राची स्कॉर्पिओ गाडी त्यांच्या सोसायटीच्या समोर उभी करण्यात आली होती. मंगळवारी ही गाडी चोरटय़ांनी चोरून नेली. ठाणे आयुक्तालयात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली असून या घटनेमुळे चोरटे आता घोडबंदर भागात सक्रिय झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.